सांगलीतील 3500 शेतकरी सौर पंपाच्या प्रतीक्षेत, ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी 6 हजार अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात येत आहेत. ज्या भागात विजेची समस्या आहे, तसेच वीज देयकाची अडचण आहे, त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळतो. सौर कृषी पंपासाठी जिल्ह्यातील ६ हजार शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे. त्यापैकी अवघ्या २ हजार ५३९ शेतकऱ्यांकडे पंप बसविण्यात आले आहेत. अद्याप साडेतीन हजार शेतकरी सौर कृषी पंपाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारने ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ ही योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. योजना जाहीर झाल्यापासून लाखाहून अधिक शेतकऱ्यांकडे सौर पंप कार्यान्वित झाले आहेत. हजारो शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, त्यांच्या अर्जावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती महावितरणने दिली आहे.

मागेल त्याला सौर पंपासाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व पंप असा संपूर्ण संच मिळतो. सामान्य शेतकऱ्यांना १० टक्के (काही ठिकाणी ५ टक्के) लाभार्थी हिस्सा भरावा लागतो, तर बाकी रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकारकडून अनुदान म्हणून मिळते. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याचेही महावितरणने म्हटले आहे.

राज्यात १० लाख सौर कृषी पंप बसविण्यात येणार असल्याने या योजनेमुळे वीजबिलाची समस्या मार्गी लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातून ६ हजार ४ शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, यापैकी २ हजार ५३९ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत, तर उर्वरित साडेतीन हजारांवर शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

कवठेमहांकाळ विभागातून सर्वाधिक ३ हजार ११७ अर्ज आले असून, १ हजार ३०९ पंप कार्यान्वित झाले आहेत. विटा ग्रामीणमधून १ हजार ३५ पैकी ४४३ पंप, सांगली ग्रामीणमधून १ हजारापैकी ४२० पंप आणि ईश्वरपूर विभागातून ८४० पैकी ३६३ सौर पंप सुरू झाले आहेत.

या योजनेमुळे सामान्य शेतकऱ्यांना ९० टक्के, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधील लाभार्थींना ९५ टक्के अनुदानासह तत्काळ सौर कृषी पंप मिळत आहेत. सौर कृषी पंपामुळे दिवसा शाश्वत वीजपुरवठा होत आहे. साडेसात एचपी (7.5 HP) पंपाचा विचार केला, तर २५ वर्षांच्या कालावधीत त्या शेतकऱ्याचे वीजबिलाचे सुमारे दहा लाख रुपये वाचणार आहेत.