
नीट (NEET) पेपरफुटीचे प्रकरण आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या आमानुष लाठीहल्ल्याच्या मुद्द्यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संसदेत एका मोठ्या स्क्रीनवर २० जुलैच्या लाठीहल्ल्याचे काही व्हिडीओ दाखवत राहुल गांधी यांनी सुरक्षा दलांनी आंदोलकर्त्या विद्यार्थ्यांशी अत्यंत अमानुष व्यवहार केल्याचा आरोप केला. हे विद्यार्थी शांततेत आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर अत्याचार केले. गेल्या १० वर्षांत देशात १५२ वेळा पेपरफुटीच्या घटना घडला. त्याचा फटका ७.७ कोटी विद्यार्थ्यांना बसला आहे. तरीही एकाही दोषीवर कारवाई झालेली नाही, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.
देशातील संपूर्ण शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी आजची तरुण पिढी करत आहे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे राहुल गांधी म्हणाले. नीट परीक्षेवर होणारा खर्च हा देशाच्या एकूण शिक्षण बजेटच्या जवळपास बरोबरीचा आहे. नीट परीक्षेसाठी १.३२ लाख कोटी रुपये विद्यार्थी खर्च करतात तर, देशाचे शिक्षण बजेट १.४ लाख कोटी रुपये आहे. ही वस्तुस्थिती मांडत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे आपल्या पदावर पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्णपणे योग्य असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
या गंभीर मुद्द्यावर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा. दुसरी मागणी म्हणजे आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, कारण हे विद्यार्थी देशद्रोही नसून आपल्याच देशाचे भविष्य आहेत. आणि तिसरी मागणी म्हणजे या संपूर्ण प्रकारावर आणि विद्यार्थ्यांच्या झालेल्या छळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, असे राहुल गांधी म्हणाले.






























































