
मुंबईत बेस्ट बसगाड्यांच्या अपघातांची मालिका सुरुच राहिली आहे. शीव-पनवेल महामार्गावर मानखुर्द ब्रिजवर बेस्ट बसला अपघात होऊन पादचाऱ्याचा मृत्यू व दहा जण जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पवईतील विहार संकुल परिसरात बेस्टच्या ताफ्यातील आणखी एका कंत्राटी एसी बस दुभाजकाला धडकून अपघात झाला. अपघातात बसमधील 7 प्रवासी जखमी झाले. बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बेस्टच्या ताफ्यातील कंत्राटी बसच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक जीवघेण्या अपघातांची नोंद झाली आहे. गुरुवारी पुन्हा बेस्ट बसचा अपघात घडल्याने प्रवासी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बेस्टच्या बस मार्ग क्रमांक ए422 वर धावणाऱ्या बसला पवईतील विहार संकुल परिसरात अपघात झाला. ही बस वांद्रे बस स्थानक (पश्चिम) ते विक्रोळी डेपो अशा मार्गावर धावते. सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, साकिनाका, पवई असा गाडीचा मार्ग आहे. शहरात पावसाचा जोर वाढला आहे. याचदरम्यान गुरुवारी सकाळी 11 वाजून 05 मिनिटांनी बसला अपघात होऊन त्यात बसमधील 7 प्रवासी जखमी झाले.
बेस्टच्या बससमोर कार आली होती. चालकाने त्या कारला वाचवण्याकडे लक्ष केंद्रीत केले होते. याचदरम्यान उजव्या बाजूच्या रस्ता दुभाजकावर बस आदळली. जखमी प्रवाशांना बस वाहकाने साकिनाका येथील पॅरामाऊंट रुग्णालयात उपचारासाठी नेले. बेस्ट प्रशासनाने वेट लिजचे अधिकारी किशोरी शिंदे यांना घटनास्थळी जाऊन पुढील चौकशी आणि आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेस्ट बसगाड्यांच्या वारंवारच्या अपघातांमुळे मुंबईकर बेस्ट प्रवासाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करीत आहेत.




























































