प्रबोधन कुर्ला शाळेची दिंडी यात्रा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला… अशा गजरात प्रबोधन कुर्ला शाळेने आयोजित केलेली दिंडी यात्रा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली. आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील विठ्ठल मंदिरापासून तकिया वॉर्ड येथील सर्वेश्वर मंदिरापर्यंत दिंडी काढण्यात आली.

शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन कुर्ला पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळेने उपक्रम आयोजित केला होता. या दिंडीसोहळ्यात कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठ्ठल-रखुमाईचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले होते. तर काही विद्यार्थ्यांनी संत परंपरेतील विविध संतांची वेशभूषा साकारली होती. पारंपरिक वेशभूषा, अभंगांच्या तालावर आकर्षक नृत्य, फुगडी, ‘पाणी वाचवा’ या विषयावरील भारुड आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. दरम्यान कुर्ल्यातील काही स्वयंसेवी संस्थांनी बालवारकऱ्यांना खाऊचे वाटप केले. यावेळी शिवसेना उपनेते व प्रबोधन कुर्ला शाळेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर, आमदार सुनील शिंदे, खासगी अनुदानित शाळा अधीक्षक किसनराव पावडे-पाटील, क्षमा गडकरी, प्रशांत गडकरी, प्रबोधन कुर्लाचे विश्वस्त शलाका कोरगावकर, खजिनदार जयदीप हांडे, निलेश कोरगावकर, मुख्याध्यापिका विशाखा परब, मुख्याध्यापक संतोष चिकणे यांच्यासह विलास पळसमकर, शुभांगी मेमाणे आदी उपस्थित होते.