Mumbai News – मुलुंडमध्ये बेस्ट बसचा अपघात; महिला सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकीकडे बेस्ट उपक्रमाकडून बेस्ट दिन साजरा केला जात आहे. त्याचदरम्यान दुसरीकडे मुंबईच्या रस्त्यांवर बेस्ट बसगाड्यांच्या अपघाताचे सत्र सुरुच राहिले आहे. मुलुंडमध्ये बेस्ट बसने पालिकेच्या महिला सफाई कामगाराला धडक दिल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात महिलेच्या डोक्यावर चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी अग्रवाल रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जयश्री भानाजी परमार असे मयत महिला कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेरुळ बस स्थानकातून मुलुंड चेक नाका बस स्थानकाकडे बस येत होती. यादरम्यान मुलुंड चेक नाका ट्रॅफिक सिग्नलवर ही घटना घडली. बस सिग्नलला थांबली असताना एक महिला रस्ता ओलांडत होती. इतक्यात हिरवा सिग्नल मिळाल्याने चालकाने बस सुरू केली. बसची पादचारी महिलेला धडक बसली आणि बसचा उजव्या बाजूचा टायर तिच्या डोक्यावरून गेला. यात ती गंभीर जखमी झाली.

बस कंडक्टरने तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला 100 नंबर डायल करून अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी होत जखमी महिलेला अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र गंभीर जखमी झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर बस मुलुंड पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून बस चालक आणि वाहकालाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.