बारवी धरणबाधित क्षेत्रात एमआयडीसीकडून भूसंपादन; मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुरबाड तालुक्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) अखत्यारित येणाऱ्या बारवी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी आता एमआयडीसी ताब्यात घेऊन शेतकऱ्यांना मोबदलाही देणार आहे. यामध्ये ६१ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन करण्यात येईल; त्यामुळे धरणाच्या विसर्गामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुरबाड तालुक्यातील बारवी धरणातून मुंबई महानगर प्रदेशातील उद्योग आणि महापालिकांना पाणीपुरवठा केला जातो. धरणाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम २०१९ मध्ये पूर्ण झाले. यंदा सततच्या पावसामुळे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले असून धरण परिसरातील काही गावांमधील शेतांमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

या पार्श्वभूमीवर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मानिवली, काचकोली, मोहघर आणि कान्होळ या गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी तसेच बारवी प्रकल्पग्रस्त संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

रस्ते आणि पुलांची सुविधा देणार

मानिवली गावातील पाहणीदरम्यान शेतांमध्ये पाणी साचलेले नसतानाही रस्ते पाण्याखाली गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. परिणामी या ठिकाणी रस्ते आणि पुलांची कामे एमआयडीसीकडून करून देण्यात येणार आहेत.

  • बारवी धरणाच्या विसर्गाच्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय एमआयडीसीने घेतला असून तब्बल ६१ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात येईल, अशी माहिती एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय सावळकर यांनी दिली.