
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यामध्ये पात्र लाभार्थ्यांना वर्षाला 3 मोफत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ देण्याबरोबरच महिलांसाठी सुरू असलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
गॅस सिलिंडर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 3 सिलिंडरची रक्कम थेट जमा केली जाणार आहे. या योजनेमुळे पात्र कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅसचा खर्च कमी करण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी ‘वेत्री पयनम’ या नव्या योजनेचीही घोषणा केली. या योजनेद्वारे महिलांसाठी सध्या सुरू असलेल्या मोफत बस प्रवास योजनेचा संपूर्ण राज्यात विस्तार केला जाणार आहे.
‘वेत्री पयनम’ योजनेअंतर्गत महानगर आणि शहरी भागांमध्ये धावणाऱ्या एक्स्प्रेस, एलएसएस आणि डिलक्स सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास करता येणार आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासासाठी ग्रामीण आणि डोंगराळ भागात धावणाऱ्या साध्या दराच्या सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
ही योजना 2 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त या योजनेची सुरुवात केली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा असणार नाही. तसेच मोफत प्रवासासाठी प्रवासाच्या संख्येवरही कोणतेही बंधन राहणार नाही. तृतीयपंथीयांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री विजय यांनी यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात अनेक कल्याणकारी योजनांची आश्वासने दिली होती. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 6 मोफत एलपीजी सिलिंडर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच 200 युनिटपर्यंत मोफत वीज, 60 वर्षांखालील महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत आणि प्रत्येक कुटुंबासाठी 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा संरक्षण देण्याचाही समावेश होता.

























































