
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. मात्र, फडणवीस यांनी आपण केंद्रात जाणार नसून महाराष्ट्रातच राहणार असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. त्यानंतरही दिल्लीत भाजपच्या गोटात फडणवीस यांना मोठी संधी देण्याबाबत वेगवान हालचाली सुरू आहेत. केंद्रीय संसदीय समितीच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय राजकारणात एंट्री होण्याची शक्यता आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वात नवी संघटनात्मक टीम स्थापन करण्यात आल्यानंतर आता पक्षात सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱया ‘संसदीय मंडळा’च्या पुनर्रचनेच्या हालचालींना वेग आला आहे. समितीत फडणवीस यांचा समावेश केला जाणार आहे. त्यामुळेच त्यांच्या दिल्ली वाऱया वाढल्याचे सांगितले जात आहे.
संघटनात्मक वजन वाढणार
भाजपच्या घटनेनुसार ‘संसदीय मंडळ’ सर्वोच्च आहे. यामध्ये पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसह 12 सदस्यांचा समावेश असतो. सध्या यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे. फडणवीस यांची या समितीत नियुक्ती झाल्यास त्याच संघटनात्मक व राजकीय वजन वाढणार आहे.





























































