
कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, त्यावर उपाय म्हणून नगरपालिका प्रशासनाकडून जनावरे पकडण्याची मोहीम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पालिकेच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांकडून तब्बल ८१ गायी पकडल्याचा दावा केला जात आहे. पालिकेने कोकमठाण गोशाळेत ६७ गायी सोडल्याचे सांगितले जात आहे. मग उर्वरित १४ गायी गेल्या कुठे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. जनावरे पकडल्याची संख्या, जनावरे नेण्यात आलेली ठिकाणे आणि त्यांची सद्यः स्थिती याचा स्पष्ट हिशेब पालिकेने जाहीर करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
पकडलेल्या जनावरांना ठेवण्यासाठी पालिकेची स्वतःची गोशाळा अद्याप अस्तित्वात नसल्याने, पकडलेल्या गायींपैकी ६७ गायी कोकमठाण येथील गोशाळेत सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी कोकमठाण येथील गोशाळेची क्षमता साधारण २०० ते २२५ पशुधनाची आहे. गोशाळेचे व्यवस्थापन पाहणारे अमित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेने ६७ गायी आणण्यापूर्वी या गोशाळेत आधीच २०६ गायी होत्या. आता एकूण पशुधनाची संख्या २७३ वर पोहोचली आहे. म्हणजेच गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक जनावरे झाली आहेत. विशेष म्हणजे, पालिकेकडून ८१ गायी पकडल्याचा दावा केला जात असेल, तर कोकमठाण गोशाळेत ६७ गायीच कशा पोहोचल्या? उर्वरित १४ गायी गेल्या कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे. जनावरे पकडल्याची संख्या, त्यांना नेण्यात आलेली ठिकाणे आणि त्यांची सद्यःस्थिती याचा स्पष्ट हिशेब पालिकेने जाहीर करणे गरजेचे आहे. क्षमता ओलांडून पशुधन एकाच गोशाळेत कोंबणे हा उपाय नसून नवा प्रश्न निर्माण करण्याचा प्रकार ठरू शकतो. पशुधनाची गर्दी वाढल्यास त्यांच्या आरोग्याची, चाऱ्याची आणि निवाऱ्याची व्यवस्था करणे कठीण होणार आहे.
दुसरीकडे, मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास असलेला धोका अजूनही कमी झालेला नाही. गेल्या काही दिवसांत पशुधनाच्या हल्ल्यात मुलांना दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ राजकारणाचा किंवा आरोप-प्रत्यारोपांचा राहिलेला नाही; तो थेट नागरिकांच्या जीविताशी संबंधित झाला आहे. पालिकेने स्वतःची गोशाळा उभारण्याची घोषणा केली आहे. मग ती गोशाळा कधी, कुठे आणि किती क्षमतेची उभारणार, याचे उत्तर आता प्रशासनाने देणे आवश्यक आहे. कागदावर घोषणा, बैठकीत दावे आणि प्रत्यक्षात दुसऱ्याच गोशाळेवर भार टाकणे, यातून मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार नाही. कारण पशुधनाचा प्रश्न जितका लांबेल, तितका नागरिकांच्या जीविताचा धोका वाढत जाणार आहे.






























































