
हिंदुस्थानच्या लष्करी आणि सामरिक ताकदीत लवकरच आणखी एक मोठी भर पडणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या अंतर्गत, ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून एका नव्या आणि शक्तिशाली क्षेपणास्त्र चाचणीची तयारी सुरू झाली आहे. हिंदुस्थानने बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर क्षेत्रात सुमारे २,९९५ किलोमीटरच्या पल्ल्यासाठी एक नवीन नोटाम (NOTAM – Notice to Airmen) जारी केले आहे.
जारी करण्यात आलेल्या सुरक्षा इशाऱ्यानुसार, ही क्षेपणास्त्र चाचणी २ आणि ३ सप्टेंबर २०२६ रोजी केली जाण्याची शक्यता आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या काळात कोणत्याही प्रकारची नागरी उड्डाणे आणि सागरी वाहतूक थांबवण्यासाठी, हवेपासून ते समुद्राच्या पृष्ठभागापर्यंतचा एक मोठा परिसर नो-फ्लाय झोन आणि डेंजर कॉरिडॉर म्हणून घोषित करण्यात आला आहे. जारी केलेल्या नोटामनुसार या चाचणीचे अंतर जवळपास २,९९५ किलोमीटर इतके असणार आहे.
कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी होऊ शकते?
टीव्ही९ भारतवर्षने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी हिंदुस्थानची मारक क्षमता अधिक प्रबळ करणाऱ्या अग्नी सीरिजच्या इंटरमिजिएट-रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (जसे की अग्नी-३ किंवा अग्नी-४) असू शकते. याव्यतिरिक्त, ही अत्याधुनिक आणि अति-लांब पल्ल्याच्या अग्नी-६ क्षेपणास्त्राची किंवा त्याच्या एखाद्या महत्त्वपूर्ण भागाची चाचणी असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

























































