
दिल्लीच्या सुधारित मतदार यादीचा आराखडा ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला असून, यातील आकडेवारीने सर्वांनाच धक्का दिला आहे. SIR मोहिमेअंतर्गत समोर आलेल्या या नव्या यादीत दिल्लीतील एकूण १.४५ कोटी मतदारांपैकी तब्बल ४७.७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. म्हणजेच, सरासरी दर ३ पैकी १ मतदाराचे नाव यादीतून गायब झाले आहे. यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोगावर आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना अरविंद केजरीवाल X वर एक पोस्ट केली आहे. ते म्हणाले, “SIR अंतर्गत दिल्लीची ड्राफ्ट मतदार यादी समोर आली आहे. १.५ कोटींपैकी ४७ लाख मतदारांची नावे यादीत नाहीत. केंद्र सरकार विनाकारण वाढत्या लोकसंख्येची चिंता करत आहे. या SIR च्या माध्यमातून निवडणूक आयोग आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटींवरून थेट ५० कोटींवर आणून ठेवेल.”
दरम्यान, निवडणूक आयोगाने ३० जून ते १७ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी मोहीम राबवली होती. या प्रक्रियेत दिल्लीतील सुमारे ६७.१८ टक्के मतदारांचे फॉर्म डिजिटल माध्यमातून भरले गेले. मात्र ज्यांचे फॉर्म प्राप्त झाले नाहीत, अशा उर्वरित ४७.७ लाख मतदारांना अनुपलब्ध (Absent, Shifted, Dead किंवा Duplicate) श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची नावे या ड्राफ्ट यादीतून कमी झाली आहेत, असे वृत्त आज तकने दिले आहे.


























































