Nepal Shaligram stone – जगातील सर्वात मोठे, 17 कोटी वर्षे जुने ‘शाळिग्राम’ पाण्याखाली; दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक करतात गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमध्ये आलेल्या महाप्रयलामध्ये 900 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 4 हजारांहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध युद्धपातळीवर सुरू असतानाच नद्यांनी बदललेला मार्ग आणि पावसामुळे पाणी पातळीत झालेली वाढ यामुळे एका प्राचीन व पवित्र धार्मिक स्थळावर संकट ओढावले आहे. नेपाळमधील गुल्मी, स्यांग्जा आणि पर्वत या तीन जिल्ह्यांच्या संगमावर असलेल्या सेतीबेनी येथील जगातील सर्वात मोठे शाळिग्राम पाण्यात पूर्णपणे बुडाले आहे.

सेती नदीने आपला मार्ग बदलल्यामुळे आणि प्रचंड पावसामुळे कालीगंडकी नदीची पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे हे पवित्र स्थळ पाण्याखाली गेले आहे. यामुळे दरवर्षी दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना मोठा फटका बसला आहे. ‘नवभारत टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पूर्वी या ठिकाणी येणारे भाविक शाळिग्राम शिळेला थेट स्पर्श करून पूजा-अर्चा करू शकत होते. मात्र, आता शाळिग्राम आणि मुख्य रस्त्याच्या मधोमध नदीचा प्रचंड प्रवाह वाहत आहे. पाणी वाढल्याने या पवित्र शिळेपर्यंत पोहोचणे पूर्णपणे अशक्य झाले आहे. भाविकांना आता लांबूनच दर्शन घेऊन निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे, असे स्थानिक भाविक प्रकाश थापा यांनी म्हटले.

Nepal Flood – महाप्रलयात नेपाळ उद्ध्वस्त; 903 जणांचा मृत्यू, 4200 हून अधिक बेपत्ता, मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू

दरम्यान, विशाल शाळिग्राम शिळेच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी बांधलेली सुरक्षा भिंत पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे कोसळली आहे. यामुळे भाविकांना शाळिग्रामची पारंपारिक परिक्रमा करणे अशक्य झाले आहे. तसेच क्षतिग्रस्त झालेल्या या बांधकामामुळे पर्यटकांच्या व भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जगातील सर्वात मोठ्या शाळिग्राम शिळेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याने स्थानिक प्रशासनावर कडक टीका होत आहे.

31 टन वजन आणि 17.5 कोटी वर्षे जुना इतिहास

नेपाळमध्ये आढळणारी ही विशाल शाळिग्राम शिळा ही प्रत्यक्षात अॅमोनाइट या जलचराचे जीवाश्म आहेत. या भव्य शाळिग्रामचे वजन सुमारे 31 टन आहे. मुक्तिनाथ धामाजवळील कालीगंडकी नदीच्या क्षेत्रात सापडलेली ही शिळा सुमारे 17.5 कोटी वर्षे जुनी मानली जाते. याला जगातील सर्वात मोठे आणि अद्वितीय शाळिग्राम मानले जाते. हिंदू धर्मामध्ये शाळिग्रामला महत्त्व असून शाळिग्राम हे भगवान विष्णूचे साक्षत प्रकट स्वरूप मानले जाते.