
उत्तराखंडमधील हल्दवानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरण विधीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षाने राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करत शुद्धीकरण करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र झाले उलटेच आणि उत्तराखंड पोलिसांनी राहुल गांधी यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यानंतर काँग्रेसने भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांची 8 ऑगस्ट रोजी हल्दवानी येथील रामलिला मैदानावर सभा झाली होती. या सभेनंतर दोन दिवसांनी हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी शुद्धिकरण आणि होम-हवन केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. दिल्लीत पत्रकार परिषद घेत राहुल गांधी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला होता.
शुद्धीकरण हा अस्पृश्यतेचाच एक प्रकार आहे आणि अस्पृश्यता हा संविधानानुसार गुन्हा आहे. भाजप, आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेच्या जागेचे शुद्धीकरण करून हा गुन्हा केला आहे. या लोकांवर अॅट्रॉसिटी कायद्याखाली लवकरात लवकर गुन्हा दाखल करा. पंतप्रधान मोदी यांनी तसे आदेश द्यावेत, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, राहुल गांधी यांनी ही मागणी केल्यानंतर अवघ्या 24 तासात उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. त्यामुळे काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी एक्सवरून भाजपवर निशाणा साधला. हा प्रकार म्हणजे उलटा चोर कोतवाल को दांटे, असाच आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच भाजपकडून जातीवादी वर्तनाचे समर्थन केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी सामाजिक अन्यायाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींचा काँग्रेस ठामपणे विरोध करेल, असेही म्हटले.
The day after LOP Sh. @RahulGandhi ji’s bold Press Conference demanding that BJP workers be prosecuted for the ‘purification’ done after Kharge ji’s rally, the Uttarakhand Police has filed an FIR against Rahul ji himself! This is nothing but the pot calling the kettle black!…
— K C Venugopal (@kcvenugopalmp) August 31, 2026
दलितांवरील अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्यांनाच लक्ष्य करण्यासाठी भाजप सरकार आपली संपूर्ण ताकद वापरत असल्याचा आरोपही वेणुगोपाल यांनी केला. हा केवळ राहुल गांधींवरील कारवाईचा प्रश्न नाही, तर संविधानाने दिलेल्या सामाजिक न्यायाच्या मूल्यांवरच घाला घालण्याचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. तसेच मल्लिकार्जुन खरगे यांचा अपमान करणाऱ्या दोषींवर कारवाई होईपर्यंत आणि राहुल गांधी यांच्याविरोधातील एफआयआर मागे घेतला जात नाही, तोपर्यंत काँग्रेस शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी काँग्रेस कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.
State-Level Protest Marches Against the Malicious FIR on LoP Shri @RahulGandhi and Demanding FIR against the BJP Workers in Uttarakhand. pic.twitter.com/OwQtRwkSCO
— Congress (@INCIndia) August 31, 2026


























































