राजकीय आकांक्षा असणं गैर नाही, सोनम वांगचूक यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) आंदोलनाचे आयोजक अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात राजकीय महत्त्वाकांक्षा असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांनी विद्यार्थी आंदोलनाचे व्यासपीठ पक्षनिरपेक्ष ठेवले, तर त्यांच्या राजकीय आकांक्षांमध्ये काहीही गैर नाही, असे मत पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी व्यक्त केले.

प्रखर गुप्ता यांच्या ‘एक्सपीरियन्स’ पॉडकास्टमध्ये बोलताना वांगचुक यांनी सांगितले की, दिपके किंवा इतर आयोजकांनी आपल्याकडे भविष्यातील राजकीय योजनांबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे राजकीय महत्त्वाकांक्षेबाबतचे आपले मत हे त्यांच्या वर्तनाचे केलेले स्वतःचे आकलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“राजकीय महत्त्वाकांक्षा असणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. त्यांच्या पूर्वीच्या राजकीय संबंधांशी मला काही देणेघेणे नाही. सध्याच्या किंवा भविष्यातील राजकीय महत्त्वाकांक्षाही माझ्यासाठी समस्या नाहीत,” असे वांगचुक म्हणाले.

आंदोलनाच्या आयोजकांमध्ये वैयक्तिक किंवा राजकीय महत्त्वाकांक्षा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे सांगताना वांगचुक यांनी म्हटले की, “ते असे संत नाहीत की त्यांना काहीही नको आहे आणि ते पूर्णपणे निःस्वार्थ भावनेने हे सर्व करत आहेत.”

आयोजकांचे नेतृत्वगुण चांगले

आंदोलनाच्या आयोजकांच्या नेतृत्वक्षमतेचे मूल्यमापन करताना वांगचुक यांनी त्यांना “चांगल्या हेतूचे”, “कुशल” आणि “सरासरीपेक्षा चांगले” असे संबोधले. त्यांच्या मते, चांगला हेतू असला पण कौशल्याचा अभाव असलेल्या व्यक्तींकडून अडचणी निर्माण होऊ शकतात; तर अत्यंत कुशल पण चुकीचा हेतू असलेली व्यक्ती त्याहून मोठा धोका ठरू शकते.

वांगचुक यांनी सांगितले की, सीजेपी आंदोलनाचे आयोजक भविष्यात एखाद्या विद्यमान राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात किंवा स्वतःचा नवा पक्षही स्थापन करू शकतात. मात्र, त्यांनी सध्याच्या सीजेपी व्यासपीठाचे रूपांतर स्वतःच्या राजकीय वाहनात करू नये.

सीजेपीला ‘निष्पक्ष, पक्षविरहित दबावगट’ ठेवण्याचा सल्ला

वांगचुक यांनी आयोजकांना हे व्यासपीठ “निष्पक्ष आणि पक्षविरहित दबावगट” म्हणून कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे सीजेपीला विद्यार्थी आंदोलन म्हणून पाहणाऱ्या समर्थकांचा विश्वास टिकवून ठेवता येईल, असे त्यांनी सांगितले.

सीजेपी कोणत्याही एका राजकीय पक्षाशी जोडलेले व्यासपीठ नसावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः भाजप, काँग्रेस किंवा आम आदमी पक्षाशी (आप) त्याची सांगड घातली जाऊ नये, कारण त्यामुळे विद्यार्थी आंदोलन म्हणून असलेली त्याची विश्वासार्हता कमी होऊ शकते, असेही वांगचूक म्हणाले.