हिंदुस्थानच्या नौदलाच्या ताफ्यात ‘आयएनएस निपुण’ दाखल; खोल समुद्रातील मोहिमांना मिळणार अधिक बळकटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी नौदलाची सागरी सुरक्षा आणि सामर्थ्य आता अधिक मजबूत झाले आहे. समुद्राच्या पृष्ठभागासह खोल पाण्यातही नौदलाची कार्यक्षमता वाढवणारे दुसरे स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट व्हेसल (DSV) ‘आयएनएस निपुण’ 31 ऑगस्ट रोजी मुंबईतील नेवल डॉकयार्ड येथे अधिकृतपणे सेवेत दाखल करण्यात आले. नौदल प्रमुख ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समावेश सोहळा पार पडला.

‘आयएनएस निपुण’ हे निस्तार-श्रेणीतील दुसरे डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आहे. हे जहाज पारंपरिक युद्धनौकेप्रमाणे थेट शत्रूशी लढा देण्यासाठी नसून, खोल समुद्रातील गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक मोहिमा पार पाडण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आले आहे. या जहाजाच्या आगमनामुळे खोल समुद्रातील डायव्हिंग, पाण्याखालील विशेष कारवाया आणि पाणबुडी बचाव कार्यात हिंदुस्थानची क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या जहाजाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील सुमारे 75 टक्के भाग पूर्णपणे स्वदेशी आहे. याच्या निर्मितीत हिंदुस्थानी उद्योग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा मोठा वाटा आहे. यामुळे खोल समुद्रातील तंत्रज्ञान आणि मोहिमांसाठी परकीय देशांवर असणारे अवलंबित्व कमी होण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

खोल पाण्यात गोताखोरी करणे, आपत्कालीन स्थितीत पाणबुडीचा बचाव करणे, समुद्राच्या तळाशी निगराणी ठेवणे आणि मलबा हटवणे यांसारख्या कठीण कामांची जबाबदारी ‘आयएनएस निपुण’वर असणार आहे. सामान्य जहाजांची पोहोच जिथे संपते, तिथे हे जहाज महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. यासाठी या जहाजावर पाण्याखाली काम करणारे आधुनिक रिमोट-कंट्रोल रोबोट्स तैनात करण्यात आले आहेत, ज्यांच्या मदतीने अत्यंत खोल भागात निगराणी ठेवून डेटा गोळा केला जाऊ शकतो. तसेच, यामध्ये आधुनिक ‘डायनॅमिक पोझिशनिंग प्रणाली’ बसवण्यात आली आहे. या प्रणालीमुळे समुद्रातील वेगाने वाहणाऱ्या लाटा आणि प्रतिकूल हवामानातही जहाजाला एकाच ठिकाणी स्थिर ठेवून मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करता येणे शक्य होणार आहे.

हिंदुस्थानी नौदलाने यापूर्वी जुलै महिन्यात ‘मालवण’ या पाणबुडीविरोधी युद्धतंत्रात (Anti-Submarine Warfare) सक्षम असलेल्या जहाजाचा ताफ्यात समावेश केला होता. त्यानंतर आता  ‘आयएनएस निपुण’ नौदलाच्या सेवेत दाखल झाल्याने हिंदुस्थानी नौदलाची सागरी ताकद अधिक मजबूत झाली आहे.