टायर फुटल्याने बसची ट्रकला धडक, अपघातात 6 ठार, अनेक जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खड्ड्यातून जाताना टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस ट्रकला धडकल्याने सहा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. गुवाहाटी-सोनपूर राष्ट्रीय महामार्गावरील नालागेडेरा येथे शनिवारी सायंकाळी उशिरा हा अपघात घडला. मृतांमध्ये बसच्या चालकाचाही समावेश आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बस नागाव येथून गुवाहाटीच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे बसचे टायर फुटले. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस रस्त्यावरील दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकवर जाऊन धडकली.

या भीषण धडकेमुळे बसचे मोठे नुकसान झाले आणि अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खेत्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.