
पार्टीमध्ये चिकनचे पीस जास्त खाल्ल्याच्या कारणातून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सिताराम असे मयत तरुणाचे तर अरुण कुमार असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात मुडलगी तालुक्यातील हुनाश्याल पीजी गावात ही घटना घडली. सिताराम हा उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील कबीरगंज गावचा रहिवासी असून नोकरीनिमित्त कर्नाटकमध्ये राहत होता.
मयत आणि आरोपी दोघेही पार्टी करत असताना चिकनचे पीस खाण्यावरून त्यांच्यात वाद झाला. एकाने दुसऱ्यापेक्षा जास्त चिकनचे पीस खाल्ल्यामुळे हा वाद सुरू झाला. हळूहळू हा वाद विकोपाला गेला आणि अरुण कुमारने सितारामच्या छातीत चाकू खुपसला. त्यानंतर स्वतःच जखमी सितारामला गोकाक सरकारी रुग्णालयात नेले. गुन्हा लपवण्यासाठी त्याने सिताराम इमारतीवरून पडल्याचा दावा केला.
अरुण कुमारच्या बोलण्याचा संशय आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी अरुण कुमारला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान अरुण कुमारने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान, उपचारादरम्यान सीतारामचा मृत्यू झाला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

























































