दलितांच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करणे भाजप-RSS ला सहन होत नाही; राहुल गांधींवरील FIR वरून जयराम रमेश यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरण प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाला दलितांचा अपमान आणि अस्पृश्यता ठरवत जोरदार आवाज उठवला होता. मात्र त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत उत्तराखंडमध्ये राहुल गांधी यांच्यावरच एफआयआर दाखल करण्यात आला. या कारवाईवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी भाजपवर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सडकून टीका केली आहे.

जयराम रमेश यांनी X वर एक पोस्ट करत भाजप आणि संघावर निशाणा साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत दलितांसोबत होणारा अन्याय, अपमान आणि भेदभावाचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांचे हे म्हणणे तंतोतंत खरे ठरवण्यासाठी भाजप-आरएसएसला चोवीस तासही लागले नाहीत. खरगे यांच्या रॅलीनंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली झालेला अपमान आणि अस्पृश्यतेचा मुद्दा राहुल गांधींनी ठळकपणे मांडला होता व दोषी भाजप कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र उत्तराखंडच्या भाजप-आरएसएसच्या डबल इंजिन सरकारला हे सत्य अजिबात सहन झाले नाही, असा आरोप रमेश यांनी केला.

याविषयी अधिक बोलताना जयराम रमेश म्हणाले की, न्याय मागणारे राहुल गांधी यांच्यावरच दुसऱ्या दिवशी एफआयआर दाखल करण्यात आला, मात्र अद्याप मुख्य आरोपींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हीच ती विकृत मानसिकता आहे, जिच्या विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान सर्वात मोठी भिंत बनून उभे आहे. त्यामुळेच यांना हे संविधान खुपते आणि म्हणूनच त्यांना ते बदलायचे आहे, असा घणाघात त्यांनी केला.