
आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘3 इडियट्स’ या लोकप्रिय चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी या बहुचर्चित सिक्वेलबाबत महत्त्वाची माहिती दिली असून, चित्रपटाची कथा सध्या लिहिली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे, सिक्वेलमध्ये मूळ चित्रपटातील कलाकारच असण्याची शक्यता असल्याचेही हिरानी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी येणाऱ्या सिक्वेलबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा अधिक वाढली आहे.
एएनआयशी संवाद साधताना राजकुमार हिरानी यांनी सांगितले की, ‘3 इडियट्स’च्या सिक्वेलची पटकथा अद्याप लेखनाच्या टप्प्यात आहे. कथा योग्य टप्प्यावर पोहोचल्यानंतरच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “कथा लिहिली जात आहे. आम्ही अजूनही लेखन करत आहोत. एकदा ती योग्य टप्प्यावर पोहोचली की मग आम्ही त्याबद्दल बोलू. सध्या तरी आम्ही लेखनच करत आहोत. कलाकार तेच असतील,” असे हिरानी यांनी सांगितले. सिक्वेलच्या कथेबाबत हिरानी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. हा चित्रपट रँचो, फरहान आणि राजू यांच्या महाविद्यालयीन जीवनावर आधारित नसेल. त्याऐवजी मूळ कथेनंतर तब्बल २० वर्षांनी त्यांच्या आयुष्यात काय घडले, यावर या चित्रपटाची कथा केंद्रित असेल.
“ही कथा विद्यार्थ्यांबद्दल नाही; तर २० वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात काय घडते, याबद्दल आहे,” असे हिरानी यांनी म्हटले. त्यामुळे प्रेक्षकांना रँचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्याचा पुढचा टप्पा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘3 इडियट्स’ने शिक्षणव्यवस्था, मैत्री, करिअर आणि पालकांच्या अपेक्षा यांसारख्या विषयांना मनोरंजक पद्धतीने हाताळत प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला होता. आमिर खान, माधवन आणि शर्मन जोशी यांच्यासोबत करीना कपूर आणि बोमन इराणी यांच्या भूमिकाही विशेष गाजल्या होत्या.
‘3 इडियट्स’चा सिक्वेल बनवण्यामागे केवळ पहिल्या चित्रपटाचे यश हे कारण नसावे, अशी भूमिका हिरानी यांनी मांडली. कथा प्रभावी आणि सांगण्यासारखी असेल तरच सिक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, सुरुवातीपासूनच ‘3 इडियट्स’चा सिक्वेल बनवण्याचा विचार नव्हता, असेही हिरानी यांनी सांगितले. ते आणि त्यांची टीम एका वेगळ्याच कथेवर काम करत असताना ती कथा ‘3 इडियट्स’च्या पुढील भागासाठी योग्य ठरू शकते, असे त्यांच्या लक्षात आले.

























































