क्लोरोक्विनच्या गोळ्या घेतल्यानंतर 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू, 52 जण रुग्णालयात दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंध्र प्रदेशातील पोलावरम जिल्ह्यातील गोल्लागुप्पा गावात मलेरिया प्रतिबंधक मोहिमेदरम्यान क्लोरोक्विनच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर एका 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर 47 मुलांसह 52 ग्रामस्थांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

पोलावरम जिल्ह्यातील येतापाका मंडळातील गोल्लागुप्पा गावात मंगळवारी मलेरियाचे रुग्ण आढळल्यानंतर, आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावकऱ्यांना क्लोरोक्विनच्या गोळ्या दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर काही तासांतच अनेक गावकऱ्यांना अस्वस्थ वाटू लागले. दरम्यान, 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे आरोग्य विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तथापि, मुलीचा मृत्यू थेट क्लोरोक्विनमुळे झाला की इतर कोणत्या कारणामुळे, हे अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही.

पोलावरम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. दिनेश कुमार यांनी मुलीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. तसेच अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या भद्राचलम शासकीय रुग्णालयात 47 मुलांसह एकूण 52 गावकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.