
माजी अव्वल मानांकित हिंदुस्थानी बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने आपल्या अनुभवाचा आणि आक्रमक खेळाचा धडाका दाखवत चायना मास्टर्स सुपर-750 स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदविला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या व्हिक्टर लईला श्रीकांतने सरळ दोन गेममध्ये 21-18, 21-19 असे नमवत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
33 वर्षीय श्रीकांतने पिछाडीवरून मुसंडी मारत व्हिक्टर लईचा प्रतिकार मोडून काढला. यंदाच्या यूएस ओपन सुपर-300 स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या श्रीकांतने आपल्या भन्नाट जंप-स्मॅशने लईला अक्षरशः जेरीस आणले. गेल्या महिन्यात नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावलेल्या लईसमोर श्रीकांतचा अनुभव पुन्हा एकदा भारी ठरला.
पहिल्या गेममध्ये श्रीकांत 3-7 असा पिछाडीवर होता, मात्र लईकडून झालेल्या सलग चुका हेरत त्याने 8-8 अशी बरोबरी साधली. मध्यंतराला लईने दोन गुणांची आघाडी घेतल्यानंतर 15-11 अशी स्थिती केली होती, मात्र श्रीकांतने त्यानंतर खेळाचा वेग वाढवत दमदार जंप-स्मॅश आणि नेटवरील अचूक खेळाच्या जोरावर 15-15 अशी बरोबरी साधली. त्यानंतर 18-16 अशी आघाडी घेत श्रीकांतने पहिला गेम 21-18 असा खिशात टाकला.
दुसऱया गेममध्येही श्रीकांतची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. तो 5-9 असा मागे पडला, मात्र हिंदुस्थानी शटलरने हार मानण्यास नकार दिला. 9-14 वरून त्याने सलग आक्रमक फटके लगावत 13-14 अशी रंगत निर्माण केली. लईच्या नेटवरील चुकांचा फायदा घेत श्रीकांतने 18-18 अशी बरोबरी साधली. त्यानंतर लईचा फटका बाहेर गेल्याने श्रीकांतला मॅच पॉइंट मिळाला आणि पुढच्याच चुकांवर त्याने सामना खिशात घातला.
2021 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा रौप्यपदक विजेता आणि माजी जागतिक क्रमांक एक असलेला श्रीकांत आता उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या ली चुक यू याच्याशी दोन हात करणार आहे.
तन्वीची झुंज अपुरी
महिला एकेरीत नुकतेच तैपेई ओपन सुपर-300 चे विजेतेपद पटकावणाऱया हिंदुस्थानच्या तन्वी शर्माला मात्र जागतिक क्रमांक नवव्या जपानच्या टोमोका मियाझाकीकडून पराभव पत्करावा लागला. तन्वीने चांगली झुंज देत दुसरा गेम जिंकला. मात्र निर्णायक गेममध्ये तिचा खेळ विस्कटला आणि मियाझाकीने 21-17, 18-21, 21-16 असा विजय मिळवत पुढची फेरी गाठली. मिश्र दुहेरीत हिंदुस्थानच्या ध्रुव कपिला-तनिषा क्रास्टो यांचेही आव्हान संपुष्टात आले. चायनीज तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग-ह्सू यिन हुई जोडीने हिंदुस्थानी जोडीचा 21-18, 21-18 असा पराभव केला.


























































