
राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश संजीव प्रकाश शर्मा यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संदीप मेहता यांनी सरन्यायाधीशाला चौथे पत्र लिहिले आहे. न्यायमूर्ती शर्मा यांच्या मनमानी, संशयास्पद आणि उघडपणे दडपशाहीच्या कृत्यांबाबत आणखी माहिती व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा मेहता यांनी केला आहे.
न्यायमूर्ती शर्मा यांनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप न्यायमूर्ती मेहता यांनी केला आहे. त्याकरिता त्यांनी 2 ऑगस्ट, 10 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश सूर्य कांत यांना याआधीच तीन पत्र पाठवले होते. या पत्राची प्रत सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियममधील इतर सदस्यांनाही पाठवण्यात आली होती. आता त्यांनी चौथे पत्र पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती मेहता यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीशांची अन्य उच्च न्यायालयात बदली करून राजस्थान उच्च न्यायालयासाठी नवीन मुख्य न्यायाधीश नियुक्त करण्याची मागणीही केली होती. मी माझी बाजू सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यासमोर मांडली आहे.
चौथ्या पत्रात काय?
आता समोर आलेल्या चौथ्या पत्रात न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी न्यायमूर्ती संजीव प्रकाश शर्मा यांच्यावर अंतर्गत न्यायिक चौकशीत हस्तक्षेप केल्याचा, गोपनीयतेचा भंग केल्याचा आणि प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय नियमांमध्ये मनमानी पद्धतीने बदल करणे, जमिनीच्या वादात न्यायालयीन हस्तक्षेप करणे तसेच राजस्थान उच्च न्यायालयातील व्यापक भ्रष्टाचार आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या ढासळण्याचेही आरोप त्यांनी केले आहेत.





















































