
आग्रा येथील बाह भागातील एका गावात खराब झालेल्या रस्त्यावर रुग्णवाहिका जवळपास दोन तास अडकल्याने एका नवजात मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ही घटना 2 सप्टेंबर रोजी गढवार गावात घडल्याचे सांगितले जात आहे. प्रदीप सिंह यांच्या पत्नीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी सरकारी रुग्णवाहिका बोलावली होती.
रुग्णालयात जात असताना खराब झालेल्या रस्त्यावर रुग्णवाहिका अडकली. त्यानंतर ती बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांना रुग्णवाहिका ट्रॅक्टरला बांधून ओढावी लागली, असे तक्रारीत म्हटले आहे. अखेर महिला रुग्णालयात पोहोचली; मात्र तोपर्यंत नवजात बाळाचा श्वास थांबला होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेने व्यथित झालेल्या प्रदीप कुमार यांनी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.
इससे दुर्भाग्यपूर्ण क्या होगा कि भाजपा के भ्रष्टाचार की वजह से वो भी मारे जा रहे हैं, जिन्होंने अभी जन्म भी नहीं लिया है। pic.twitter.com/YZU9MewKDH
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) September 7, 2026
उपविभागीय दंडाधिकारी विनोद कुमार यांनी सांगितले की, 5 सप्टेंबर रोजी ही तक्रार प्राप्त झाली होती. ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवण्यात आली असून, त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे.
कुमार म्हणाले, ‘अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल’.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या घटनेची बातमी असलेली क्लिप एक्सवर शेअर करत या मृत्यूला भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचे म्हटले.
ते म्हणाले, ‘यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट आणखी काय असू शकते — भाजपच्या भ्रष्टाचारामुळे जे अद्याप जन्मालाही आलेले नाहीत, त्यांनाही मारले जात आहे.’


























































