
एसआयआर सर्वेक्षणाच्या माध्यमातून मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्याच्या कार्यक्रमात भिवंडी तालुक्यात असलेल्या तीन मतदारसंघांतून तब्बल एक लाख ७९ हजार २२८ मतदार गायब तर ३० हजार ७८० मतदार मृत असल्याचे समोर आले आहे. भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण अशा तीन विधानसभा मतदारसंघांमधील १० लाख ६६ हजार ७१२ मतदारांपैकी फक्त ६ लाख ५८ हजार ९६५ मतदारांचे डिजिटलायझेशन पूर्ण झाले आहे. ४ लाख ७ हजार ७४७ नावे वगळण्यात आली आहेत.
भिवंडी पालिका क्षेत्रासोबतच लगतच्या ग्रामीण भागात स्थलांतरित मजूर वर्गाचा भरणा अधिक असल्याने अनेकांनी आपली नावे भिवंडीसोबतच आपल्या मूळ गावी मतदार यादीतसुद्धा समाविष्ट ठेवली होती. अशी ३७ हजार २४६ दुबार नावे वगळण्यात आली तर १ लाख ५० हजार ५१७ मतदार स्थलांतरित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या मतांच्या जीवावर उमेदवार विजयी होत असतात. त्यामधील किमान पन्नास टक्के नावे एसआयआरमध्ये बाद ठरल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या जात आहेत.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात २०२४मध्ये नमूद ३ लाख ७६ हजार १३८ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ४४६ मतदारांची नोंद यशस्वी झाली असून १ लाख ८४ हजार ६९२ नावे वगळण्यात आली आहेत.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४६ हजार ७७४ मतदारांपैकी १ लाख ९१ हजार ६८९ मतदारांची नोंद झाली आहे तर १ लाख ५५ हजार ८५ मते बाद झाली आहेत.
भिवंडी ग्रामीण मतदारसंघात परिस्थिती चांगली आहे. या मतदारसंघात ३ लाख ४३ हजार ८०० मतदारांपैकी २ लाख ७५ हजार ८३० मतदारांची नोंद यशस्वी झाली असून ६७ हजार ९७० मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
वाड्यातील ६० मतदान केंद्रांचा समावेश
भिवंडी तालुक्यातील तिन्ही मतदारसंघांमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या संख्येने मतदारांची नावे गायब झालेली आहेत. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात वाडा तालुक्यातील काही गावांचा समावेश होतो. वाडा तालुक्यातील ६० मतदान केंद्रे या मतदारसंघात येत आहेत. गायब असलेल्या नावांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.























































