दिल्लीमध्ये मणिपुरी गिटारवादकाची बेदम मारहाणीत मृत्यू, आठ जणांवर आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमधील प्रतिभावान गिटारवादक आणि संगीत शिक्षक चोंगथम विक्रम सिंह (55) यांचा दिल्लीतील त्यांच्या घराबाहेर आठ जणांनी बेदम मारहाण केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी रात्री सुमारे 11 वाजता काही जण नशेत त्यांच्या घराबाहेर गोंधळ घालत होते. हा प्रकार थांबवण्यासाठी सिंह खाली गेले. काही मिनिटांनी ते दरवाजा ठोठावत दरवाजा उघडा असे ओरडत असल्याचे कुटुंबीयांनी ऐकले. त्यांचा 20 वर्षीय मुलगा याइफाबा याने सिंह यांना बेशुद्ध अवस्थेत, फाटलेल्या टी-शर्टसह आढळून आले. त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र रक्तदाब 50 mmHg पेक्षाही कमी झाल्याने प्रकृती अत्यंत गंभीर होती. शस्त्रक्रिया करणे शक्य झाले नाही आणि सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

सिंह हे इम्फाळ पश्चिममधील थांगमेइबंद लौरुंग पुरेल लीकाई येथील रहिवासी होते. मणिपूरमधील विविध बँडमध्ये लीड गिटारवादक म्हणून काम केल्यानंतर ते सुमारे 20 वर्षांपूर्वी दिल्लीला आले होते. त्यांनी दिल्लीमध्ये संगीताची शाळा सुरू केली होती, घरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच दिल्ली स्कूल ऑफ म्युझिकमध्येही अध्यापन केले. ‘रॉक’एन’रूट्स’ प्रकल्पादरम्यान त्यांनी राजस्थानी लोकगायक मामे खान यांच्यासोबत काम केले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि मैफलींसाठी त्यांनी अनेक नामांकित संगीतकारांसोबत काम केले. सिंह हे हिंदुस्थानातील पहिल्या BAFTA पुरस्कार विजेत्या ‘बूंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योत्सना (54) आणि मुलगा याइफाबा असा परिवार आहे. त्यांची 86 वर्षीय आई चोंगथम ओंगबी कमला देवी या प्रसिद्ध मणिपुरी गायिका आहेत.

सिंह यांचे भाऊ विवेक यांनी सांगितले की, त्यांचे 96 वर्षीय वडील डॉ. चोंगथम बीरेंद्र सिंह यांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. आई या धक्क्याने अस्वस्थ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

शवविच्छेदन पूर्ण झाले असले तरी न्याय मिळेपर्यंत मृतदेह मणिपूरला पाठवू नये, अशी भूमिका दिल्लीतील मणिपुरी संघटनांनी घेतली आहे. दरम्यान, ईशान्येकडील विद्यार्थी संघटना, मित्र आणि कुटुंबीयांनी घटनेच्या निषेधार्थ सनलाइट कॉलनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले.