बीड जिल्हा होरपळला, दुष्काळ जाहीर करा; जयसिंह सोळुंकेनी घेतली कृषी मंत्र्यांची भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यात खरीप पिके उद्ध्वस्त झाली आहेत, शेतकरी प्रचंड तणावात आहे. वर्षभराचे आर्थिक गणित कोलमोडले आहे अन्न धान्य कोठून आणायचे, चारा प्रश्न गंभीर होत चालला आहे, पाणी टंचाईचा ही सामना करावा लागणार आहे. अशा भयावह परिस्थितीत तातडीने मार्ग काढण्यासाठी कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा अशी मागणी जयसिंह सोळुंके यांनी केली आहे. मंगळवारी सोळुंके यांनी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांची भेट घेऊन त्याबाबत निवेदन दिले.

मंगळवारी मुंबई येथे कृषीमंत्री दत्ता मामा भरणे यांची जयसिंग सोळुंके यांनी भेट घेऊन निवेदन दिले. मराठवाड्यात या वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने कापूस, तूर, मुग, उडीद या सह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा. तसेच शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याची तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सोळुंके यांनी या निवेदनातून केली आहे.

शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त केली. तसेच सध्या निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीचे वास्तव कृषी मंत्री यांच्यासमोर मांडण्यात आले.