लष्करी अळीचा हल्ला, पिके धोक्यात; शहापूर, किन्हवली, अघई, खर्डीत प्रादुर्भाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनियमित पावसामुळे शहापूर तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त असताना आता भात, नागली, वरई आणि उडीद पिकांवर लष्करी अळीने हल्ला केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शहापूर, किन्हवली, खर्डी आणि अघई परिसरातील पिके हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या अळीचा प्रदुर्भाव कमी करण्यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हवामानातील सततचे बदल, त्यातच पावसाने दिलेली उघडीप यामुळे पिकांवर विविध रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात लष्करी अळीने शेतांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः तृणधान्य वर्गातील भात, नागली, वरई आणि उडीद या पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. लष्करी अळी प्रामुख्याने रात्रीच्या वेळी पिकांची पाने कडांपासून खाते तर दिवसा जमिनीलगत किंवा पिकाच्या गाभ्यात लपून राहते. त्यामुळे सुरुवातीला तिचा प्रादुर्भाव सहज लक्षात येत नाही.

लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दोन-तीन दिवसांत पिकांची पाने मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. पाने खाल्ली गेल्यामुळे त्याचा मोठा परिणाम उत्पादनावर होतो.

लष्करी अळी दिवसा पिकाच्या गाभ्यात लपलेली असल्याने तिच्यावर औषध फवारणीचाही पाहिजे तसा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

शेतकऱ्यांनी पिकांची बारकाईने पाहणी करून अळीचा प्रादुर्भाव आढळताच तातडीने उपाययोजन कराव्यात, कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे नियंत्रण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.