
दहीहंडीच्या दिवशी रिलीफ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला शिवीगाळ व कर्मचाऱ्यावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी शिंदे गटाचा पालघर शहरप्रमुख राहुल घरत आज अखेर पोलिसांना शरण आला. त्याला लगेच अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. डोंबिवली पॅटर्नप्रमाणे डॉक्टरांना शिवीगाळ व रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरीही हे आरोपी अजून मोकाट असून त्यांच्यावर कारवाई होणार तरी कधी, असा सवाल विचारण्यात येत आहे.
शनिवारी राजयोग मॉलमध्ये शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख कुंदन संखे याने दहीहंडीचे आयोजन केले होते. त्यावेळी थर लावत असताना पाच गोविंदा जखमी झाले. त्यातील एका गोविंदावर उपचार करण्यावरून रिलीफ हॉस्पिटलमध्ये वाद निर्माण झाला. काही जणांनी रुग्णालयात शिवीगाळ व अर्वाच्य भाषा वापरली. हॉस्पिटलमधील डॉ. लिजिमोल व डॉ. विशाल कोडगिरकर यांना कुंदन संखे याच्यासह शिंदे गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी धमकी देत शिवीगाळ केली. तसेच शहरप्रमुख राहुल घरत याने तर रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा याला बेदम मारहाण केली आणि त्याच्या कानशिलातही लगावली.
हॉस्पिटलमधील डॉक्टरांना शिवीगाळ व एका कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख व शहरप्रमुखासह १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज शहरप्रमुख राहुल घरत हा स्वतः पोलिसांसमोर हजर झाला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांनी दिली.
जामीनासाठी युक्तिवाद
शिंदे गटाचा शहरप्रमुख राहुल घरत याला न्यायाल यात हजर केले असता त्याच्या वतीने अॅड. धर्मेंद्र भट यांनी जामीन मिळवण्यासाठी युक्तिवाद केला. रुग्णाल यातील कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून ही घटना घडल्याचा दावाही वकिलांनी केला. मात्र न्यायालयात जामीन न देता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































