
मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातील संघर्षाचा फटका आता थेट प्रशासकीय यंत्रणेला बसत असून अधिकाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. अधिकाऱ्यांनी काम केले तरी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या जात आहेत आणि काम नाही केले तरी त्यांना तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. या छळवणुकीमुळे अधिकारी हैराण झाले आहेत. राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे.
सरनाईक आणि मेहता यांच्यातील वादामुळे एका बाजूने निर्णय घेतला तर तक्रारींचा सामना आणि दुसऱ्या बाजूने काम केले तर त्यावरही आक्षेप, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नियमांनुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. या संघर्षाचा फटका महपालिका अधिकाऱ्यांसह महसूल, निबंधक कार्यालय आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनाही बसू लागला आहे.
राजकीय संघर्षामुळे विकासाला ब्रेक
बांधकामविषयक परवानग्या, महसूलविषयक कामे, नोंदणी प्रक्रिया, कायदा-सुव्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबी यांचा थेट संबंध नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आहे. राजकीय संघर्षामुळे जर अधिकाऱ्यांचा मोठा वेळ तक्रारी, स्पष्टीकरणे, चौकशी आणि परस्परविरोधी निर्देश हाताळण्यात खर्च होत असेल तर विकासकामांना विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
आमदारांनी तक्रारी करून काम बंद पाडल्यानंतर शहरातील विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पालिका आयुक्तांना उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले आहेत. असे प्रकार आता दिवसेंदिवस वाढू लागल्याने अधिकारी हैराण झाले आहेत.
लोकप्रतिनिधींच्या मतभेदांचे निराकरण राजकीय पातळीवर होणे अपेक्षित असताना त्याची झळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बसणे ही गंभीर बाब आहे, असे मत अनेक अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
अधिकाऱ्यांना कायदा, शासन निर्णय, नियम आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे निर्णय घ्यावे लागतात. मात्र दबाव येत असल्याने अधिकाऱ्यांची मोठी अडचण होत आहे.
दोघांच्या भांडणात अधिकाऱ्यांची कोंडी झाल्यामुळे त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होण्याची शक्यता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
एका लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार कारवाई केली तर दुसऱ्या बाजूने त्यावर आक्षेप घेतला जात आहे. या परिस्थितीत तक्रारींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो, अशी खंत काही अधिकाऱ्यांनी व्यक्त करून या दबावतंत्रावर मोठी नाराजी व्यक्त केली आहे.



























































