
तेलंगणा विधानसभेमध्ये आज एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. राजू असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते प्रधान सचिव नवीन मित्तल यांचे स्वीय सहाय्यक (पीए) म्हणून कार्यरत होते.
विधानसभेत कामकाज सुरू असतानाच कर्तव्यावर असलेले राजू हे अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना कोसळलेले पाहून एकच गोंधळ उडाला. यावेळी पशुसंवर्धन मंत्री वाकीती श्रीहरी यांनी तत्काळ राजू यांना सीपीआर देण्यास सुरुवात केली आणि वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय पथक आणि मंत्र्यांच्या प्रयत्नांनंतर राजू काहीसे शुद्धीत आले. त्यांना लगेचच पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


























































