दिल्ली इमारत दुर्घटना; वसतिगृह, पीजी सुरक्षेसाठी लवकरच नियमावली, सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील सत्य निकेतन येथे पीजी वसतिगृहाची इमारत कोसळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून देशभरातील सर्व विद्यार्थी वसतिगृह आणि पीजी सुरक्षेसंदर्भात देशव्यापी नियमावली जारी करण्याची न्यायालयाची तयारी आहे. आमच्याकडे काही योजना आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढवू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सत्य निकेतन परिसरात पाच मजली इमारत रविवारी कोसळली होती. त्यात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. अहसानुद्दीन अमानुल्ला आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याप्रकरणी अमिकस क्युरी नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ विधिज्ञ अजित सिन्हा यांनी तत्काळ सुनावणी करावी, जेणेकरून आवश्यक निर्देश देता येतील, अशी विनंती केली. त्यावर न्यायालयाने म्हटले की, हा एक गंभीर विषय आहे. आम्ही काही विचार करत आहोत, काही योजना आहेत, असे म्हणत न्यायालयाने याप्रकरणी पुढील सुनावणी 10 सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

विद्यार्थी भयभीत, सत्य निकेतनमधून निघाले

दिल्ली विद्यापीठाजवळ असलेल्या सत्य निकेतन परिसरात मोठ्या संख्येने पीजी वसतिगृह आहेत, मात्र रविवारच्या घटनेनंतर विद्यार्थी भयभीत झाले आहेत. आतापर्यंत जिथे वास्तव्य होते तो परिसर, इमारती आणि खोली भीती दाखवत आहेत. अनेकांना दोन दिवसांपासून झोप नाही. विद्यार्थ्यांच्या पालकांचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी सत्य निकेतन सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत. काही जण इतर परिसरातील मित्र व नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. काही जणांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली आहे.