
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे, कल्याण, वसई-विरार आणि नवी मुंबईतील सुमारे एक हजार घरांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर जाहिरात येणार असून दिवाळीला लॉटरी निघणार आहे. या लॉटरीतील बहुतेक घरे 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील असणार आहेत. या योजनेतील घरांचा समावेश असलेली ही शेवटची लॉटरी असणार आहे. त्यामुळे खासगी बिल्डरांच्या प्रकल्पात कमी किमतीत हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची ही सुवर्णसंधी आहे.
सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवाळीदरम्यान सात ते आठ हजार घरांची लॉटरी काढण्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाचे नियोजन होते. यात 20 टक्के योजनेतील जवळपास पाच हजार घरांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र नुकतीच नगरविकास विभागाने 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील घरांबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या योजनेतील घरांचे वाटप करण्याचे अधिकार यापुढे म्हाडाऐवजी संबंधित महापालिकांकडे देण्यात आले आहे. त्यामुळे 12 ऑगस्टपूर्वी म्हाडाला 20 टक्के योजनेतील जी घरे उपलब्ध झाली त्या घरांचाच आगामी लॉटरीत समावेश करण्यात येणार आहे.
20 ते 25 लाखांदरम्यान किमती
आगामी सोडतीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश असणार आहे. या घरांच्या किमती 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत असतील, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
कोकण मंडळाच्या गेल्या वर्षी झालेल्या 5,285 घरांच्या सोडतीत 20 टक्के योजनेतील 565 घरांचा समावेश होता. 565 घरांसाठी तब्बल 1 लाख 15 हजारांहून अर्ज प्राप्त झाले होते. सर्वाधिक प्रतिसाद नवी मुंबईतील घरांना मिळाला होता.



























































