
जीडीपी वाढ आणि क्रेडिट रेटिंगच्या सुधारणेवरून काँग्रेसवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळाचाही विसर पडला. तब्बल 30 वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानला ‘ए’ क्रेडिट रेटिंग मिळाल्याचा दावा त्यांनी केला. मात्र या काळात वाजपेयी यांचेही सरकार अनेक वर्षे होते. त्यामुळे मोदींनी वाजपेयी सरकारच्या अपयशावरही बोट ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बीकेसीतील जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये आजपासून सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी देशाच्या वाढलेल्या जीडीपीचे दाखले देत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. ‘जगभरात सध्या अनिश्चिततेचे वातावरण आहे. व्यापारी पातळीवर तणाव आहेत. पुरवठा साखळय़ा विस्कळीत झाल्या आहेत. चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही आव्हानात्मक होती. अशा स्थितीतही हिंदुस्थानने 7.8 टक्क्यांनी आर्थिक विकास केला. हिंदुस्थानने एकप्रकारे जगाला नवा विश्वास दिला. त्याच विश्वासातून जपानच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीने हिंदुस्थानला प्रथमच ‘ए’ रेटिंग दिले. मागच्या 30 वर्षांत देशाच्या नशिबी हे भाग्य आले नव्हते, असे ते म्हणाले. तीस वर्षांचा हिशेब मांडताना त्यांचा रोख मनमोहन सिंग यांच्याकडे होता. मात्र, या कालावधीत पाच वर्षे, 13 महिने आणि 13 दिवस वाजपेयी यांचेही सरकार होते हे मोदी विसरले.


























































