
>> प्रभाकर पवार
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात (गुरुवार, दि. २७ ऑगस्ट) सिन्नर तालुक्यातील मलढोण व दशिंगपूरदरम्यान समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांनी लोखंडी धारदार वस्तू टाकून छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या वकिलांच्या गाड्यांचे टायर पंक्चर केले. वकिलांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील १८ लाख रुपयांचे दागिने व रोख रक्कम पळवून नेली. या लुटीनंतर दरोडेखोर थांबले नाहीत. पहाटेपर्यंत जी गाडी दिसेल तिला अडवून, दगडफेक करून १० ते १२ दरोडेखोरांनी महामार्गावर अक्षरशः हैदोस घातला होता. अशा धाराशीव-बीडच्या अर्धा डझन दरोडेखोरांना नाशिकचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी व त्यांच्या पथकाने अल्पावधीतच अटक केली, परंतु रात्री-अपरात्री समृद्धी महामार्गावरून रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्यांचे काय? निर्मनुष्य महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जिवावर बेतण्यासारखे आहे. समृद्धी महामार्ग हा दरोडेखोरांसाठी पर्वणी ठरला आहे. महामार्गावर लुटले गेलेले सर्वच प्रवासी तक्रार करीत नाहीत. याचाच फायदा दरोडेखोरांनी घेऊन समृद्धी महामार्गावर आक्रमण सुरू केले आहे. याचा लवकरात लवकर बंदोबस्त होईल, संघटित दरोडेखोरी मोडून काढली जाईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी व्यक्त केला आहे.
किरण अजिनाथ गायकवाड (२८. बीड), अर्जुन पवार (धाराशीव), लखन काळे (धाराशीव), धनाजी पवार (धाराशीव), नितीन शिंदे (धाराशीव), गोविंद पवार (धाराशीव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे या टोळीकडून पोलिसांनी टायर पंक्चर करण्यासाठी वापरलेले लोखंडी खिळे, धारदार शस्त्रे, लाठ्याकाठ्या व लुटण्यात आलेले काही दागिने हस्तगत केले आहेत. महामार्गावरील लुटमारीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपल्या गाड्या महामार्गावर टायर पंक्चर झाल्यास थांबवू नयेत, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
दोन दशकांपूर्वी धाराशीवचे दरोडेखोर रात्रीच्या वेळेस मुंबईत यायचे दिसेल त्या (रँडमली) कुणाच्याही घरात रात्री घुसायचे. हल्ला करायचे. प्रतिकार करणाऱ्यांना थेट आपल्याकडील हत्यारांनी ठार मारायचे. २००३ च्या सुमारास घाटकोपर (पश्चिम) गोळीबार रोड येथील ममता बिल्डिंगमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी ज्येष्ठ नागरिक नरोत्तम मेहता (६५), त्यांची पत्नी हंसा (६०), मुलगा जय (३०) तसेच पहारेकरी मारुती सालम (३५) अशा चौघा जणांची निर्धाणपणे हत्या करून घरातील सोने व रोख रक्कम पळवून नेली. घाटकोपर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक फत्तेसिंग गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी फासेपारधी दरोडेखोरांना धाराशीव-सोलापूर भागात सापळे मालाड (पश्चिम) येथे रात्री उशिरा पवनबाग हाऊसिंग सोसायटीमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांनी घटनास्थळी पोहोचलेल्या रवी सावंत व अनिल कलाल या मालाड पोलीस ठाण्याच्या पोलीस शिपायांवर व वॉचमनवर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांना ठार मारले होते हे मुंबई पोलीस दलातील कुणीही कर्मचारी, अधिकारी अद्यापि विसरलेला नाही. रवी सावंत व अनिल कलाल यांच्या हत्या केल्यानंतर दरोडेखोरांनी काही काळानंतर बोरिवलीमध्ये दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, परंतु तत्कालीन पोलीस उपायुक्त विक्रांत देशमाने यांच्या पथकाने तो हाणून पाडला पोलिसांच्या गोळीबारात चड्डी-बनियान गँगचा एक सदस्य गंभीर जखमी झाला. त्यानंतर कधी चड्डी बनियान गँगने मुंबईत पाय ठेवला नाही.
मुंबईत दरोडेखोरांचा वाढता शिरकाव पाहून बहुचर्चित चकमक’ फेम अधिकारी प्रदीप शर्मा व त्यांच्या सहका-यांनी दरोडेखोरांविरुद्ध तीव्र मोहीम सुरू केली. विलेपार्ले येथे टोनी ऊर्फ अन्थोनी या दरोडेखोराला प्रदीप शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चकमकीत ठार मारले तर कांजूरमार्ग येथे प्रिन्स निरीक्षक प्रफुल्ल भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंठस्नान घातले. पोलीस निरीक्षक महेश तावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कट्टा शेखर टोळीतील भास्कर शेट्टी या दरोडेखोराला दिंडोशी येथे अस्मान दाखविले. याचा धसका चड्डी-बनियान गैंगने घेतला आणि मुंबईत गेल्या दोन दशकांत कधी पाय ठेवला नाही याचे श्रेय मुंबई पोलिसांना जातेः परंतु आता महामार्गावरील वाढते दरोडे पाहता चड्डी-बनियान किंवा धाराशीव-सोलापूरमधील दरोडेखोरांच्या टोळ्या पुन्हा एकदा मुंबईवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चड्डी-बनियान टोळ्या या अत्यंत क्रूर समजल्या जातात. चेहऱ्यावर मुखवटे घालून व अंगाला तेल लावून हे नराधम फक्त चड्डीवर दरोडे घालतात. दिवसा भिकाऱ्याच्या सोंगात किंवा मजुराच्या वेषात फिरून घरांची रेकी करतात. कचरा गोळा करण्याचेही काम करतात. घरांची, बंगल्यांची पाहणी करून रात्री दरोडा घालतात अशा या खतरनाक टोळ्या मध्य प्रदेशातून व महाराष्ट्रातील काही दुर्गम भागांतून शहरी भागात येत आहेत. समृद्धीसारख्या महामार्गावर दरोडे घालत आहेत. अशा दरोडेखोरांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कमालीची दक्षता घेणे आवश्यक आहे. आपल्या बंगल्याच्या किंवा घराच्या अवतीभोवती हाय वेंटेजचे दिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बसविले पाहिजेत. घरात पैसा, दागदागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. बँकेत लॉकरमध्ये ते सुरक्षित ठेवले पाहिजेत. दरोडेखोर घरात घुसल्यास प्रतिकार करणे टाळावे. शक्यतो आपल्याच घरातील बंद खोलीत स्वतःला कोंडून घेतले पाहिजे तरच तुमचा जीव व महिलांची अब्रू वाचू शकते.
समृद्धी महामार्गावरील लुटमार व प्राणघातक हल्ल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढविली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मोठ्या प्रमाणात बसविण्यास सुरुवात केली आहे. टोलनाक्यांवर ध्वनिक्षेपकांद्वारे प्रवाशांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तेव्हा अलीकडे डोंबिवली, नवी मुंबई व महामार्गावर आतंक माजविणारी चड्डी बनियान गँग मुंबई शहरात कधी थैमान सुरू करील हे सांगता येणार नाही. तेव्हा जनहो, सावधान! पोलिसांनो आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर्स तयार ठेवा..

























































