
प्रत्येक दारू पिणारा धिंगाणा घालत नाही. सणासुदीला एखादा दारू पिऊन उत्साहाच्या भरात असेल तर तो मद्यपी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेलच, असा दावा करता येणार नाही. गणपतीचा सण आहे, लोकांना तो साजरा करू द्या, अशा स्पष्ट शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य शासनाला बजावले आहे.
पुण्यातील 12 दिवसांच्या दारूबंदीला याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले होते. मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांमागचा हेतू स्वागतार्ह आहे. पण अशा प्रकारे सरसकट बंदी घालणे योग्य नाही. तसेच अशा प्रकारची बंदी केवळ पुण्यापुरतीच का करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही बंदी का नाही, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.
मात्र ही बंदी 12 दिवसांची नाही. 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तर 25 सप्टेंबर, विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण दिवस व सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन होईपर्यंत दारूबंदी लागू राहील, असे पुणे जिल्हाधिकारी यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी तहकूब केली.
रोज पिणाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल
सरसकट 12 दिवसांची दारूबंदी केल्यास दररोज पिणाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. दवाखाने तुडुंब भरून जातील. तेव्हा अशा प्रकारे दारूबंदी करणे व्यवहार्य ठरणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
बापटांमुळे पुण्यात दारूबंदी
14 सप्टेंबरला पुण्यात दारूबंदी का करण्यात आली आहे, असा सवाल न्यायालयाने केला. काही दिवसांपूर्वी पुण्यात वाद झाला. डीजेला विरोध केल्याने (विद्यानंद बापट) तणाव निर्माण झाला होता. 14 तारखेला गणेश आगमन आहे. त्या दिवशी गणेश आगमनासाठी महिला रस्त्यावर उतरतात. तेव्हा काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारूबंदी करण्यात आली आहे, असे पुणे प्रशासनाच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.




























































