
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची 115 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईत पार पडली. 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेची एकूण उलाढाल 56,249 कोटी रुपये झाली असून बँकेला 702 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. भरीव नफ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शिफारस केलेल्या दहा टक्के लाभांशास सभेने बहुमताने मान्यता दिली. गतवर्षी बँकेला 651 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेची वैधानिक गंगाजळी व भाग भांडवल मिळून बँकेचा स्वनिधी 8,175 कोटी झाला आहे.
राज्य बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभेच्या सुरुवातीला बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी आर्थिक वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत 31 मार्च 2026 अखेरीस बँकेच्या प्रगतीचे निकष सभासदांना अवगत केले. सभेला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार प्रवीण दरेकर, संजय भेंडे, अभिजित पाटील, माजी आमदार राजेश टोपे, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने, सीए सुधीर डबीर उपस्थित होते.
31 मार्च 2026 अखेर राज्य बँकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) 5,747 कोटी रुपये असून, गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये 351 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. राज्य बँकेचे नक्त मूल्य आजमितीस देशातील सर्व सहकारी बँकांमध्ये जास्त आहे. – विद्याधर अनास्कर, प्रशासक, राज्य सहकारी बँक



























































