गणेशोत्सवाच्या खरेदीवर पावसाचे सावट; पुढील दोन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघरला ‘यलो अलर्ट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेलेला पाऊस गणेशोत्सवात परतणार आहे. 14 सप्टेंबरला येणाऱ्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी खरेदीत व्यस्त असलेल्या भाविकांना खरेदीच्या अखेरच्या दोन दिवसात पावसाचा देखील सामना करावा लागणार आहे. हवामान विभागाने (IMD) १२ आणि १३ सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या दोन दिवसांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची (ताशी ३० ते ४० किमी वेग) आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गणेशोत्सवाच्या सुरुवातीला पाऊस कसा असेल?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच लाडक्या बाप्पाच्या आगमनावेळी मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर १५ सप्टेंबर रोजी, दीड दिवसांच्या गणपती विसर्जन सोहळ्याच्या दिवशी, शहरात हलक्या ते मध्यम सरी बरसण्याचा अंदाज आहे.

पावसाची आतापर्यंतची आकडेवारी

या वर्षी १ जूनपासून आतापर्यंत कुलाबा वेधशाळेत १,८०९.९ मिमी, तर सांताक्रूझ वेधशाळेत २,२५९.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाने विश्रांती घेतल्याने कुलाबा केंद्रावर सरासरीच्या तुलनेत घट नोंदवण्यात आली असून, सध्या पाऊस सरासरीपेक्षा ४.३ मिमीने कमी आहे. दुसरीकडे, सांताक्रूझ केंद्रावर पाऊस अद्याप सरासरीपेक्षा ७ मिमीने अधिक आहे.

मान्सूनच्या परतीचा प्रवास

मुंबईतून नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) परतण्याची सर्वसाधारण तारीख ८ ऑक्टोबर मानली जाते. गेल्या वर्षी मान्सून आठवडाभर उशिरा म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी परतला होता, तर २०२४ मध्ये मान्सूनच्या परतीला अधिक विलंब झाला होता आणि २३ ऑक्टोबर रोजी अधिकृत परतीची घोषणा करण्यात आली होती. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.