
>> वीरभद्र मिरेवाड
बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी शब्दांना पंख बहाल केलेत. त्यांनी बालकाला केंद्रबिंदू मानून सुरू केलेला शब्दयज्ञ आता महाराष्ट्रभर प्रयोगशील बालसाहित्याच्या माध्यमातून फुलतो आहे. नुकताच त्यांचा ‘पिवळीधमक सगुणाबाई’ हा बालकुमार कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहात एकूण तेरा कथांचा समावेश असून पहिलीच कथा ‘पिवळीधमक सगुणाबाई’ या नावाने हळदीचे महत्त्व सहजगत्या विशद करणारी आहे. हळद ही निसर्गाची नवलाईच. मानवाच्या आरोग्यासाठी ती केवढी उपयोगी. आव्हाड यांनी हळदीची कहाणीच कथारुपातून, संवादातून सांगितलेली आहे. भाजी, आमटी पिवळीधमक करणारी हळद सर्दी खोकल्यावर, जखमावर, सांधेदुखीवर, रक्तशुद्धीसाठी किती उपयोगी आहे हे नव्याने उलगडते.
पाण्याचा प्रत्येक थेंब म्हणजे भविष्यातील जीवनाचा अमूल्य ठेवा असून जल हेच जीवनाचे अमृत आहे. पाण्याची महती ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या कथेतून आव्हाडांनी उलगडून दाखवली आहे. अन्नाला चव आणि शरीराला संजीवनी बहाल करणारं आलं. सुशांत आपल्या आई-वडिलांशी गप्पा मारताना आल्याचं महत्त्व विचारतो आणि याचे सुंदर चिंतन ‘हे तर आलं’ या कथेत आव्हाडांनी मांडले आहे. लहान मुलांना अभ्यासात कंटाळा येतो. ते आजचे काम उद्यावर ढकलून विसरून जातात. वेळेचे बंधन ते पाळत नाहीत. अशावेळी त्यांना समजून घेणं आणि त्यांची चूकही दाखवून देणं अतिशय
महत्त्वाचं! हेच काम घरातील आजी मोठय़ा कौशल्याने करते. याचे चित्रण आव्हाड यांनी ‘नंतरला असतं अंतर’ या कथेतून छानच केले आहे. कथेतील पात्रांच्या वर्तनात आव्हाड हे किती सहजपणे परिवर्तन घडवून आणतात हेच त्यांच्या कथांचे मोठे गुणवैशिष्टय़ आहे.
22 एप्रिल हा दिन जगभर ‘वसुंधरा दिन‘ म्हणून साजरा केला जातो. पृथ्वीवरील पर्यावरणाचा ऱहास करणाऱया अविचारी माणसांना जागं करण्याचा हा दिन आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मोहन भागवत सरांनी मुलांना वसुंधरा दिनानिमित्त एक सुंदर कथा सांगितली ते चीनमधील चिमण्यांची! चीनमध्ये चिमण्या मारल्यामुळे त्यावर्षी भाताचे उत्पन्न घटले. कारण चिमण्या भाताबरोबर नासाडी करणारे किडे, पिके कुरतडणारे कीटकही टिपत होते. यावरून निसर्गाचा समतोल राखणं किती महत्त्वाचं आहे हे या कथेतून सिद्ध होते. वसुंधरा दिन ही केवळ माहिती नाही तर ती मुलांना, समाजाला व देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या जबाबदारीची आठवण व जाणीव करून देणारी सुंदर गोष्ट आहे.
‘परोपकारी लसूण’ या कथेतला लसूण चक्क बोलतो. या कथेतून आव्हाडांनी लसणाचे औषधी, आरोग्यवर्धक आणि उपयुक्त गुण अतिशय प्रभावीपणे सांगितले असून स्वतचे अस्तित्त्व इतरांच्या भल्यासाठी समर्पित करणाऱया लसणाची महतीही अधोरेखित केली आहे.
‘चला झाड होऊया’ या कथेतून मुलांच्या मनात परोपकाराची भावना रूजते. फळ, फूल, पान, मूळ, खोड हे झाडाचे अवयव आणि त्यांचे कार्य याचे प्रत्ययकारी चित्रण आई, शशांक, श्रीया, माधुरी,राघव या पात्राच्या माध्यमातून आव्हाडांनी मुलांसमोर उजागर केले आहे. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा. त्यांना आम्ल,आम्लारी, संयुग हे सहजतेने समजावेत. लिंबात सायट्रिक आम्ल असते. लाकडाच्या लगद्यापासून पांढराशुभ्र कागद बनवण्याकरिता आम्लाचा उपयोग होतो. कुंकू घरीच तयार करता येते या सर्व वैज्ञानिक बाबी आव्हाडांनी रंजक पद्धतीने कथेत मांडल्यामुळे मुलांच्या ज्ञानाचं उपयोजन झालं आहे. ते प्रत्येक कथेतून नवा सिद्धांत प्रकट करतात. आणि तो सिद्धांत सिद्ध करण्याची त्यांची शैली उल्लेखनीय आहे. मुलांचे भावविश्व, चिंतन, सातत्य, साहित्याची बैठक आणि आधुनिक मांडणी यामुळे त्यांच्या कथेचे आत्मीयतेने स्वागत होईल यात शंका नाही.
पिवळीधमक सगुणाबाई
लेखक ः एकनाथ आव्हाड
प्रकाशक ः मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे n पृष्ठे ः 96,
किंमत ः 295/- रुपये
























































