लेन्स आय – आपल्याच धुंदीत…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> राखी अरदकर, [email protected]

सकाळची वेळ होती. बागेत सहजच फेरफटका मारत होते. कोवळ्या उन्हात झाडांच्या पानांवर साचलेले दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते. झाडांवरून अलगद गळणारी फुले, लगडलेली फळे, पानांमधून डोकावणारे नाजूक रंग आणि पक्ष्यांचा किलबिलाट… सगळ्या वातावरणात एक प्रसन्न शांतता भरून राहिली होती.

असंच फिरत असताना एका पिवळ्याशार फुलाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्याच्या पाकळ्यांचा आकार नेहमीपेक्षा थोडा वेगळा वाटत होता. ‘हे फूल असं का झालं असेल?’ या कुतूहलाने मी त्याच्या अगदी जवळ गेले आणि पाहते तर काय! त्या फुलावर एक हिरवागार ग्रासहॉपर अगदी निवांत बसला होता!

पिवळ्या फुलाच्या पार्श्वभूमीवर त्याचा हिरवा रंग इतका खुलून दिसत होता की जणू निसर्गानेच रंगांची एक सुंदर रचना केली होती. फुलाच्या पाकळ्या आणि त्या हिरव्या कीटकाची देहयष्टी याच्यातला हा रंग माझ्या नजरेला फार भावला.

तो मात्र माझ्या उपस्थितीपासून पूर्ण अनभिज्ञ होता. आपल्या जगात, आपल्या लयीत तो फुलावर रमला होता. त्याला ना घाई होती, ना कसली चिंता. वनस्पती खाणारा हा छोटासा जीव पक्षी, बेडूक आणि इतर प्राण्यांच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे. पण त्या क्षणी त्याचं शास्त्राrय महत्त्व बाजूला राहिलं होतं. माझ्यासाठी तो निसर्गाच्या सुंदर चित्रातील एक जिवंत रंग झाला होता.

निसर्गाकडे पाहताना अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टी कधी कधी आपल्याला थांबवतात. दवबिंदू, गळून पडलेलं फूल, पानांची सळसळ, पक्ष्यांचा आवाज किंवा एखादा छोटासा कीटक… रोजच्या धावपळीत दुर्लक्षित होणाऱया या गोष्टी मनाला मात्र खूप काही सांगून जातात.

त्या हिरव्या ग्रासहॉपरकडे पाहताना एक विचार मनात आला. आपणही कधी कधी असंच आपल्या जगात रमायला हवं. कोणाला काही सिद्ध करण्याची घाई न करता, अपेक्षांच्या ओझ्यापासून थोडं दूर जाऊन, आपल्या आवडीच्या क्षणात मनापासून जगायला हवं.

कदाचित म्हणूनच निसर्ग आपल्याला वारंवार शिकवत असतो. सुंदर होण्यासाठी मोठं असण्याची गरज नाही. आणि आनंदी होण्यासाठी फार काही मिळवण्याचीही गरज नाही.
फक्त आपल्या लयीत, आपल्या धुंदीत जगता आलं पाहिजे…