
जत तालुक्यातील डफळापूर येथे महापुरुषांचे पोस्टर काढल्याच्या कारणातून दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी दोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत तसेच हाणामारीत सातजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. गावात तणाव असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख तुषार दोशी यांनी दिली.
डफळापुरातील एका चौकात महापुरुषाचे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर अज्ञात व्यक्तींनी काढून बाजूला ठेवल्याचे समोर आल्यानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. यावेळी काठी तसेच धारदार हत्यारांचा वापर झाल्याची माहिती असून, दोन्ही बाजूंनी दगडफेकही करण्यात आली. या घटनेत दोन्ही गटांतील सातजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
डफळापुरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी गावात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्याचबरोबर अधिकाऱयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या. नागरिकांनीही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दंगल नियंत्रण पथक तैनात
घटनेनंतर डफळापूर गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; पण परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, दंगल नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलीस फौजफाटा गावात दाखल करण्यात आला आहे.






















































