
देशात सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिकृत स्नेहभोजनात केवळ शाकाहारी पदार्थांचा समावेश केल्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसनेते पवन खेरा यांनी मोदी सरकारवर सडकून टीका करत, “ज्या विविधतेमुळे हिंदुस्थानची जागतिक ओळख आहे, त्या विविधतेची मोदी सरकारला लाज वाटते का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. जागतिक मंचावर देशाचे प्रतिनिधित्व करताना हिंदुस्थानची खरी आणि बहुसांस्कृतिक ओळख लपवली जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
पवन खेरा यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, हिंदुस्थानची खाद्यसंस्कृती अत्यंत समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असून त्यात शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या आहारांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. देशातील बहुसंख्य नागरिक त्यांच्या रोजच्या आहारात मांसाहाराचाही अवलंब करतात. मात्र ब्रिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील दिग्गज नेत्यांसमोर केवळ शाकाहारी मेनू सादर करणे, हा हिंदुस्थानची खरी विविधता डावलण्याचा प्रकार आहे. जागतिक मंचावर हिंदुस्थानची केवळ एकांगी आणि एका विशिष्ट विचारधारेला अनुकूल अशीच प्रतिमा उभी करण्याचा मोदी सरकारचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा घणाघात खेरा यांनी केला आहे.
देशाची खरी ताकद ही इथल्या बहुविध संस्कृतीत आणि विविधतेत दडलेली आहे. मग ती भाषा असो, पेहराव असो किंवा अन्नसंस्कृती असो, असेही खेरा म्हणाले आहेत. परदेशी पाहुण्यांना हिंदुस्थानच्या खऱ्या, सर्वसमावेशक आणि विविधतेने नटलेल्या संस्कृतीची ओळख करून देण्याऐवजी, सरकार केवळ स्वतःच्या राजकीय आणि वैचारिक अजेंड्यानुसार कृती करत आहे, अशी टीका त्यांनी केली.
























































