
जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 99 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी हिंदुस्थानकडून ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची अधिकृत एंट्री म्हणून निवड करण्यात आली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने (एफएफआय) आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. देशभरातील 30 हून अधिक चित्रपटांमधून दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या पहिल्याच चित्रपटाने बाजी मारली आहे. तब्बल 11 वर्षांनंतर मराठी चित्रपटाला हा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी, कोर्ट या मराठी चित्रपटांनी ऑस्करमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते.
एफएफआयचे अध्यक्ष अभय सिन्हा, सचिव धर्मेंद्र मेहरा, खजिनदार संग्राम शिर्पे, संरक्षक टी. पी. अग्रवाल, उपाध्यक्ष हिराचंद, निशांत उज्ज्वल आणि अध्यक्ष पी. शेषाद्री यांच्या उपस्थितीत मुंबईत ऑस्करच्या अधिकृत एंट्रीची घोषणा करण्यात आली. ‘डोरोथी’, ‘बालन’, ‘बायसन’, ‘अंग’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘धुरंधर -1, ‘धुरंधर -2 ’, ‘इक्कीस’, ‘बॉर्डर 2’, ‘देऊळबंद 2’ आणि ‘द शेप ऑफ मोमो’, ‘हनुमान अंश’ यांसारखे विविध भाषांतील अनेक दर्जेदार आणि चर्चित चित्रपट हिंदुस्थानच्या अधिकृत ऑस्कर प्रवेशाच्या शर्यतीत होते. त्यांना मागे टाकून ‘गोंधळ’ने बाजी मारली.
- 99 व्या ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 रोजी लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. ऑस्करमध्ये ‘गोंधळ’ हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व करणार आहे. या मराठी चित्रपटाने हिंदीसह विविध भाषांतील 33 चित्रपटांच्या स्पर्धेत बाजी मारल्याने या पुरस्कार सोहळ्याकडे साऱयांचे लक्ष असेल.
मातीतल्या कथांना ओळख मिळाली
या चित्रपटात लीड भूमिका साकारताना जोडलेला हा प्रवास आज एका अभिमानाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. एका अभिनेत्याच्या दृष्टीने हा क्षण केवळ वैयक्तिक आनंदाचा नाही, तर मराठी सिनेमाला आणि आपल्या मातीतल्या कथांना मिळालेली जागतिक ओळख आहे. मराठी भाषेतील आणि महाराष्ट्राच्या मातीतून आलेली गोष्ट जगाच्या कानाकोप्रयात पोहोचतेय, ही प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे, असे ‘गोंधळ’ चित्रपटातील प्रमुख पात्र साकारणारे योगेश सोहोनी म्हणाले.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान
फिल्म फेस्टिव्हलमध्ये देशातील दुःख, गरीबी यांच्यावर आधारित चित्रपटांची चर्चा होते. पण त्यापलीकडेही आपल्या देशाचा जो समृद्ध वारसा आहे, तो दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. ‘गोंधळ’चा गाभा हिंदुस्थानच्या मातीतला असला तरी त्याची दृश्यभाषा, तांत्रिक गुणवत्ता आणि निर्मितीमूल्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यामुळे स्पर्धेत चांगली कामगिरी करू. त्यादृष्टीने तयारी सुरू करू, असे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणाले.
























































