
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मध्य प्रदेशमधील गुणा या त्यांच्या संसदीत मतदारसंघात रस्त्याच्या मागणीवरून एक तरुण चांगलाच आक्रमक झाला. रस्ता नाही, तर मत नाही असे म्हणत या तरुणाने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. हे ऐकताच ज्योतिरादित्य शिंदे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले. माझ्याशी अशा भाषेत बोलू नका, असे म्हणत शिंदे यांनी सदर तरुणालाच खडसावले.
गुणा नगरपालिकेच्या हद्दीतील एका भागातील नागरिक रस्त्याची दूरवस्था आणि नवीन रस्ता न झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्रस्त होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदे हे एका कार्यक्रमासाठी एका गावाकडे जात असताना, हातात फलक घेतलेल्या स्थानिक रहिवाशांनी “रस्ता नाही, तर मतदान नाही” अशा घोषणा देत शिंदे यांचा ताफा अडवला.
Citizen: “Please get the road built on time, otherwise we won’t vote.”
Scindia: “Never use this language in front of me.” 🤬 pic.twitter.com/2QtDkAwDVg
— Gems (@gemsofbabus_) September 18, 2026
यावेळी एका रहिवाशाने शिंदे यांच्याशी थेट संवाद साधताना म्हटले, “यावेळी आमचा रस्ता तयार व्हावा, हीच आमची विनंती आहे. अन्यथा पुढील निवडणुकीत तुम्ही जेव्हा मते मागण्यासाठी याल, तेव्हा आमच्या पूर्ण कॉलनीतील एकही नागरिक तुम्हाला मतदान करणार नाही.”
नागरिकांचा हा इशारा ऐकून ज्योतिरादित्य शिंदे प्रचंड संतप्त झाले. रहिवाशाला फटकारले ते म्हणाले, “माझ्याशी बोलताना पुन्हा कधीही या भाषेचा वापर करायचा नाही, समजले? मी प्रत्येकाचे ऐकून घेत आहे. तुम्ही माझ्याकडे या आणि विनंती करा, ते काम करून घेणे ही माझी जबाबदारी आहे.” त्यांच्या या आक्रमक पवित्र्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, या घटनेचा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाल्यानंतर आणि नागरिकांचा रोष पाहता ज्योतिरादित्य शिंदे चांगलेच बॅकफूटवर गेले. त्यानंतर त्यांनी तातडीने सूत्र हलवत एका जाहीर कार्यक्रमात भाषण करताना रस्त्याच्या बांधकामासाठी 3 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली.



























































