Ratnagiri News – ढोल ताशांच्या गजरात संगमेश्वर परिसरातील गणरायांना निरोप; पावसाने विश्रांती घेतल्याने भक्तांच्या आनंदाला उधाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा दिवसांपासून भक्तीभावाने पूजा अर्चा केल्यानंतर सात दिवसांच्या गौरी गणपतींना आज शनिवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणेश विसर्जना साठी शास्त्री व सोनवी, बावनदी किनाऱ्यावर भाविकांनी गर्दी केली होती.पावसाने विश्रांती घेतल्याने भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते.

संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच दिवसापूर्वी ७ हजार गणपतींची घरोघरी प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यातील काही दीड दिवसांच्या गणपतींनी भावपूर्ण निरोप देण्यात आला होता. मात्र त्यानंतर सहा दिवसांच्या गणरायांना शनिवारी निरोप देण्यात येणार असल्याने यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणूकीसाठी ग्रामिण भागासह शहरी भागात जय्यत तयारी करण्यात आली होती. अनेकांनी भाडेतत्वावर गाडया घेऊन सजविल्या होत्या. सहा दिवसांच्या गणपतींना निरोप देण्यासाठी सर्वच ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत गणेशभक्तांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

गणेश चतुर्थी पासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे गणेश भक्तात कमालीचा उत्साह होता. घरोघरी सत्यनारायण पूजा, आरत्या, भजन, टिपऱ्या, फुगड्या, जाखडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गेले सहा दिवस पाऊस नसल्यामुळे भक्तांच्या आनंदाला उधाण आलं होतं. संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सात हजार गणपतींना संध्याकाळी निरोप देण्यात आला. यावेळी शास्त्री सोनवी व बावनदी किनारी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. कोठेही अनुचित प्रकार होवु नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.