
गणपती बाप्पा मोरया …. , पुढल्या वर्षी लवकर या …, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला चा गजर करत टाळ मृदंग , लेझीम , पारंपरिक ढोल सनई टिमकी खालूबाजाच्या ठेक्यावर ताल धरत वाजत गाजत नाचत विसर्जन मिरवणूकीने गौरी गणपतींना गिम्हवणे दुबळेवाडी येथून वाहणाऱ्या नदी पात्रात श्री गणपती बाप्पांसह गौरींचे मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले.
कोकणातील लोक हे उत्सवप्रिय लोक आहेत. सांस्कृतिक , धार्मिक सण उत्सव साजरा करण्याची येथील परंपरेला अनन्यसाधारण असे महत्व आहे. आणि म्हणूनच कोकणातील लोक ऋण काढतील पण सण साजरे करतील असे म्हटले जाते इतके ते उत्सवप्रिय लोक आहेत. गौरी गणपती हा कोकणातील तसा मोठा सण अशा या गौरी गणपती सणाची खरी सुरुवात ही भाद्रपद चतुर्थीला श्री.गणरायांच्या प्रतिष्ठापनेने होते त्यानंतर महालक्ष्मी किंवा ज्येष्ठा गौरीचं. गौरी म्हणजे संपन्नतेचे, समृद्धीची देवता. घरात सुखशांती नांदावी म्हणून प्राचीन काळापासून घराघरात गौरीपूजन केले जाते. माहेरवाशीण घरी येते त्यामुळे महिला गौरीपूजनाची आतुरतेना वाट पाहत असतात. भाद्रपद पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन होतं. गौरीच आवाहन अनुराधा नक्षत्रावर, पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर तर विसर्जन मुळ नक्षत्रावर केलं जातं. त्यानुसार गणारायांची प्रतिष्ठापना भाद्रपद चतुर्थीला म्हणजेच सोमवारी १४ सप्टेंबर रोजी करण्यात आली.त्यानंतर दिड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले त्यानंतर जेष्ठा गौरींचे आवाहन अनुराधा नक्षत्रावर गुरुवारी १७ सप्टेंबर रोजी करण्यात आले आणि शुक्रवारी १८सप्टेंबर रोजी मोठ्या आनंदात जेष्ठा गौरींचे पूजन करण्यात आले. तर शनिवारी १९ सप्टेंबर रोजी गिम्हवणेत गौरी गणपतींचे विसर्जन करण्यात आले.



























































