
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी आगामी २०२७ च्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती स्पष्ट केली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून भाजपची २७,००० मते कमी केली जातील, असे ते म्हणाले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
यावेळी बोलताना अखिलेश यादव यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच सामाजिक मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची सातत्याने होत असलेली विटंबना आणि त्यांच्यावर होणारे हल्ले हा अत्यंत गंभीर विषय असून भाजप सरकार दलितांच्या प्रतीकांचे रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच राज्यातील शेतकरी वर्ग सध्या तीव्र संकटातून जात असून शेतकर्यांच्या समस्यांकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीत जनता या सर्व गोष्टींचा हिशेब नक्कीच घेईल आणि समाजवादी पक्ष भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.


























































