पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणीला अटक, जाणून घ्या काय आहे प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. इम्रान खान यांना तुरुंगात मिळणाऱ्या वागणुकीविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या त्यांच्या बहीण अलीमा खान यांना लाहोरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. पीटीआय कार्यकर्त्यांसोबत मिळून अलीमा खान या येत्या २७ सप्टेंबरपासून इम्रान खान यांच्या सुटकेसाठी मोठे आंदोलन सुरू करण्याच्या तयारीत होत्या. मात्र त्याआधीच शहबाज सरकारच्या पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

अलीमा खान या त्यांचा ड्रायव्हर आमिर याच्यासोबत जिमखान्याला जात असताना त्यांच्या घराबाहेरूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर त्यांना तातडीने कोट लखपत तुरुंगात नेण्यात आले असून त्यांची गाडी मोझांग पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पीटीआयच्या एका प्रवक्त्याने या अटकेला दुजोरा दिला आहे. नुकतेच अलीमा खान यांनी भावाला मिळणाऱ्या वागणुकीवर उघडपणे भाष्य करत सरकारला लक्ष्य केले होते, त्यानंतर काही दिवसांतच ही अटकेची कारवाई झाली आहे.

शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली लाहोरच्या डेप्युटी कमिशनरने अलीमा खान यांना ३० दिवसांसाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा गुप्तचर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. इम्रान खान यांच्या समर्थकांकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य आंदोलनाची धास्ती घेत प्रशासनाने हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.