
गणेशोत्सवात मुंबई पोलीस उत्तम कामगिरी बजावत असतानाच, कुलाब्यातील एका गणेशोत्सव मंडळात मात्र एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने राजकीय आकसातून दहशत माजवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून याप्रकरणी डीसीपी (ट्रॅफिक साऊथ) हेमराज राजपूत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकीत मकरंद नार्वेकर यांना समर्थन न दिल्याचा राग मनात ठेवून एका विशिष्ट राजकीय व्यक्तीच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी ही बेकायदेशीर कारवाई केल्याचे राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे.
संजय राऊत यांनी X वर हे पत्र शेअर केले आहेत. या पत्रात लिहिले आहे की, “मुंबईतील गणेशोत्सवात पोलीस उत्तम कामगिरी बजावत आहेत. उत्सवास गालबोट लागू नये म्हणून ते विशेष कष्ट घेत आहेत. त्याबद्दल आपले अभिनंदन.” ते म्हणाले की, “मुंबईतील काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांना मी रोज भेटी देत असतो. शुक्रवारी बालगोपाल मित्र सार्वजनिक उत्सव मंडळ (३, पास्ता लेन, कुलाबा) येथे गेलो असताना तेथील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेशभक्त मला भेटले व त्यांनी एक गंभीर तक्रार केली. गणेशोत्सवासाठी पालिकेचा वैध परवाना असताना डीसीपी ट्रॅफिक साऊथ झोन हेमराज राजपूत यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना जागेवर जाऊन धमक्या, शिवीगाळ असे प्रकार केले. उपस्थित महिलांशी असभ्य, अरेरावीचे वर्तन केले. महिलांकडून मोबाईल खेचून घेतले. हे चित्र धक्कादायक आहे.”
संजय राऊत यांनी पात्रात लिहिले आहे की, “गणेशोत्सवाच्या मंडपासाठी रीतसर परवानगी आहेच व अनेक वर्षे हा उत्सव त्याच जागेवर होत असताना डीसीपी राजपूत यांनी अशाप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण का करावे? त्यामागे कोणते राजकारण व राजकीय व्यक्ती आहे काय? या घटनेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण झाले आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न पांडे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. माझ्या माहितीनुसार या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मकरंद नार्वेकर यांचे महापालिका निवडणुकीत समर्थन केले नाही याचा राग मनात ठेवून डी.सी.पी. राजपूत यांनी हे बेकायदेशीर वर्तन केले ते घृणास्पद आहे. त्या विभागातील इतर कोणत्याही सार्वजनिक उत्सवाची अडचण या पोलीस उपायुक्तांना झाली नाही. पण ३, पास्ता लेन, कुलाबा येथील सार्वजनिक उत्सव त्यांच्या डोळ्यात खुपला. हे आश्चर्यकारक आहे.”
त्यांनी पुढे लिहिले आहे की, “माझी आपल्याला विनंती आहे की, आपण या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत. मंडळाचे पदाधिकारी आजही डीसीपी राजपूत यांच्या दहशतीखाली आहेत व ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, अशी त्यांना भीती आहे.”
Shri @DevenBhartiIPS ji
आपल्या माहिती साठी! pic.twitter.com/7t56RIbECG— Sanjay Raut (@rautsanjay61) September 20, 2026

























































