लोकशाही संपवण्याचे हत्यार म्हणजे SIR, आडवाणी यांना SIR ची नोटीस आल्याप्रकरणी खरगे यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (SIR) काम सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान दिल्लीतील अनेक व्हीव्हीआयपी राजकीय व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या यादीत माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यापासून ते माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांच्यापर्यंत अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बिहारमधून सुरू झालेली SIR प्रक्रिया आता दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे म्हटले. काँग्रेस सुरुवातीपासूनच या प्रक्रियेला ‘दोषपूर्ण प्रक्रिया’ का म्हणत होती, हे आता सत्ताधाऱ्यांच्या लक्षात येत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

खरगे यांनी SIR ही केवळ भाजपच्या ‘मतचोरी’साठी आणि लोकशाही संपवण्यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया असल्याचा आरोप केला. ही ‘दोषपूर्ण प्रक्रिया’ आता त्यांच्याच लोकांना अडचणीत आणणारी ठरल्याचे त्यांनी म्हटले.

या प्रक्रियेत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, विद्यमान परराष्ट्र मंत्री, दिल्लीचे नायब राज्यपाल, राज्यसभा खासदार, माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींना नोटिसा देण्यात आल्याचा दावा खरगे यांनी केला. यापूर्वी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित वैज्ञानिक आणि माजी नौदल प्रमुखांनाही नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘कुठल्या आधारावर त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला?’ असा सवाल खरगे यांनी केला.

निवडणूक आयोगाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून ‘VIP/marked electors’ असा उल्लेख केल्याचा दावाही खरगे यांनी केला. ‘सार्वत्रिक प्रौढ मताधिकारामध्ये आता मतदारांची विशेष श्रेणी आहे का? व्हीआयपी मतदार आणि सामान्य मतदार अशी विभागणी केली जात आहे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भारतीय संविधानाने दिलेल्या ‘One Person, One Vote, One Value’ या तत्त्वाचा हा अवमान नाही का, असा प्रश्नही खरगे यांनी उपस्थित केला. ‘व्हीआयपी मत आता अधिक मौल्यवान झाले आहे का?’ असा सवाल त्यांनी केला.