
चेहऱ्यावर नैसर्गिक गुलाबी चमक यावी आणि त्वचा मऊ राहावी, यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधने वापरण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने तुम्ही गुलाबाचे मॉइश्चरायझर तयार करू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांसोबत कोरफड, खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई यांचा वापर करून हे मॉइश्चरायझर तयार करता येते.
गुलाबाचे मॉइश्चरायझर बनवण्यासाठी साहित्य
गुलाबाची ३-४ पाकळ्या, गुलाबजल, ३ चमचे कोरफडीचा रस किंवा जेल, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल एवढे साहित्य लागेल.
कसे बनवायचे?
सर्वप्रथम गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडे गुलाबजल घाला आणि बारीक वाटून घ्या. तयार झालेली पेस्ट स्वच्छ कापडातून गाळून त्याचा रस काढा.
आता एका वाटीत ३ चमचे कोरफडीचा रस किंवा जेल, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल घ्या. हे सर्व पदार्थ चांगले मिसळा. त्यानंतर त्यात तयार केलेला गुलाबाचा रस घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिसळा. मिश्रण गुळगुळीत झाले की घरगुती गुलाब मॉइश्चरायझर तयार आहे.
चेहऱ्यावर कसे लावायचे?
सकाळी क्लिन्झरने चेहरा स्वच्छ केल्यानंतर हे मॉइश्चरायझर चेहऱ्यावर हलक्या हाताने लावून मसाज करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ केल्यानंतरही याचा वापर करता येतो.
मात्र, हे मिश्रण घरगुती असल्याने ते जास्त दिवस साठवून ठेवण्याऐवजी कमी प्रमाणात तयार करणे योग्य ठरेल. तसेच संवेदनशील त्वचा असल्यास चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हाताच्या छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. खाज, जळजळ किंवा लालसरपणा जाणवल्यास वापर थांबवा.



























































